Friday, June 19, 2015

75 th Marathi बहुतां जन्मां अंती जन्मलासी नराpost  दोन अभंगाचे एकत्रित post.

Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in

e- mail address is rgphadke@gmail.com

अभंग १ ला :-
बहुतां जन्मां अंती जन्मलासी नरा । देव तूं सोयरा करीं आतां ॥ १ ॥
करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं आतां ॥ २॥
सांडीं आतां कुडी कल्पनेचि वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥ ३॥
पंढरीस जावें सर्व सुख घ्यावें । रूप तें पहावें विटेवरी ॥ ४॥
विटेवरी नीट आनंदाचा कंद । तुका नाचें छंदे नामघोषे ॥ ५ ॥
अभंग २ रा :-
बरे झाले आजिवरी । नाही पडलो मृत्यूचे आहारी ।
वांचोन आलो एथवरी । उरले ते हरी तुम्हां समर्पण ॥ १ ॥
दिला या काळे अवकाश । नाही पावलॊ आयुष्यनाश ।
कार्याकारण उरले शेष । गेलें ते भूस जावो परतें ॥ २॥
बुडणे कोठे पावता थडी । स्वप्नामाजी ओढाओढी ।
नासली जागॄतिची घडी । साच जोडी शेवटी गोड घास ॥ ३ ॥
तुम्हासी पावविली हांक । तेणे निरसला धाक ।
तुमचे भाते हे कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥ ४ ॥
रवीच्या नांवे निशीचा नाश । उदय होतांची प्रकाश ।
आतां कैचा आम्हा दोष । तू जगदीश कैवारी ।\ ५ ॥
आतां जळो देह सुख दंभ मान । न करी तयाचें साधन ।
तूं जगदीश नारायण । आलो शरण तुका म्हणें ॥ ६ ॥

अभंगाच्या मागची पार्श्वभूमी :-
हे दोन्ही अभंग तुकाराम गाथेच्या अगदी शेवटी शेवटी  वाचायला मिळतात. हे वाचले की लक्षांत येते की महाराजांनी आपल्यासारख्यांच्या उद्धारासाठीच तळमळीने हा उपदेश सांगितला आहे. पण महाराज स्वत:कडे मी कोणी मोठा ज्ञानी आहे अशी भूमीका न घेता स्वता:लाच हे सांगत आहेत. पण आपण जाणतोच की महाराज ब्रह्मज्ञानीच होते . असे संत जन्ममृत्त्यातीत असतात. पण जगामधल्यांचा दुख:परिहार व्हावा हीच त्यांची ईच्छा असते. मागे पाहिलेल्या " अणूरेणिया थोकडा … हा चरण असलेल्या अभंगामधे महाराजांनी स्पष्टच उल्लेख केला आहे की ते स्वत: जरी जन्ममृत्यातीत झाले आहेत तरीही जगावर म्हणजेच आपल्या सारख्यांचा उद्धार व्हावा म्हणून ते फक्त " उपकारापुरतेच आता उरले आहेत".


पहिला अभंग आपल्याला आठवण करून देतो आहे की आपल्याला अत्यंत दुर्लभ असा हा नरदेह मिळालेला आहे.
नरदेहाचे वैशिष्ठ्य हेच आहे की फक्त नरदेहामधेच जीवाला विचार करून योग्य अयोग्य काय ते ठरविण्याचे स्वातंत्र्य आहे.
तसे पाहिले तर सर्वच प्राणी " आहार , निद्रा, मॄत्यूभय, व मैथून " ह्यामधे सर्व जीवन काळ घालवतात.
येथे श्री समर्थांची एक ओवी आठवते ती म्हणजे
देह परमार्थी लाविलें । तरीच याचें सार्थ जालें । नाही तरी हें व्यर्थचि गेलें। नाना आघातें मृत्यपंथे ॥
पण फक्त मनुष्यच " सुखदु:खाचे कारणे कोणती ? आपण शाश्वत टिकणारे सुख मिळवू शकतो काय ? आपला निर्माता कोण आहे? त्याचा व माझा काय संबंध आहे ? मला अमरत्व मिळवता येईल काय ? कसे? ईत्यादी प्रश्नांवर विचार करू शकतो. असे विचार करणे म्हणजेच अध्यात्म-विचार करणेअर्थात देह परमार्थी लावणे होय.
ह्या प्रश्नांची उत्तरे भगवंताने गीते द्वारा दिलीच आहेत. उपनिषदांचे( वेदांताचे) अत्यंत जुने वाङ्मय पण ह्या प्रश्नांचीच उत्तरे सांगतात. व ह्याशिवाय आपल्या संतांनीही ह्यावरचे मार्गदर्शन " गाथा, दासबोध, ज्ञानेश्वरी, भागवत ईत्यादी ग्रंथांद्वारे केलेले आहे.

म्हणूनच अशा ग्रंथांचे वाचन करून , त्यात जे सांगितले आहे त्से वागून आपण आपला उद्धार करू शकतो. आता आपल्या पैकी बरेच जण सत्तरीला आलेलो आहोत. मग उशीर झाला की काय असे वाटण्याची पण शक्यता आहे. आहे. दुसîrÉÉ अभंगामधे तुकाराम महाराज आपल्याला दिलासा देताहेत की कांही हरकत नाही. अजूनही वेळ हाती आहे व त्याचा सदूपयोग करता येईल.

आता आपल्याला ह्या दोन अभंगाचा विचार करून अर्थ पाहता येतो.

दोन्ही अभंगांच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-

) पहिल्या अभंगाचे अर्थस्पष्टीकरण
प्रस्तावनेमधे आपण पाहिलेच की नरजन्म किती महत्वाचा आहे. महाराज म्हणताहेत की अरेबाबा, तुला हा नरदेह अनेक योनिंमधे फिरून आल्यावर मिळालेला आहे. आता एकच काम कर व ते म्हणजे भगवंताशी नाते जोड. त्याला आपलेसे कर. ( ह्यासाठीच शास्त्रांमधे मवविधा भक्ती सांगितल्या आहेत. ) हे नाते जोडायचे तर तुला एकच गोष्ट करावी लागेल. ती म्हणजे कांही अशा कल्पना तू धरून बसला आहेस त्यांचा त्याग कर.
मुख्यत: ह्या कल्पना म्हणजे १) वित्तेषणा ( धन-पैसा असला की सर्व सुखे मिळतील असे वाटणे व म्हणून पैसे कमविण्यासाठीच सर्व आयुष्य खर्च करणे ). ) दारेषणा :_ पुरुषाला वाटणारे स्त्रीसुखाचे आकर्षण व स्त्रीला वाटणारे पुरुषसुखाचे आकर्षण ) ह्यामुळेच वंशवृद्धी होते व तेही आवश्यकच आहे. पण कांही वयानंतर ही ईषणा असणे अयोग्य असेच आपली शास्त्रे सांगतात.
) लोकेषणा :- प्रसिद्धीची हांव. ही ईषणा प्रत्येक शिकलेल्या व्यक्तीला असू शकते.

ह्या सारख्या ईषणा माणसाच्या वासना वाढ्वतात व जर मरेतेवेळी एखादी वासना शिल्लक असेल तर त्या वासनेप्रमाणे जन्म येतो. उदाहरणार्थ दारेषणेमुळे कुत्र्याचा जन्म येण्याची शक्यताच जास्त असेल.
भागवतामधे हरीणाच्या वासनेत गुंतल्यामुळे जडभरताला हरीणाचा जन्म ह्यावा लागला ही कथा आहे.

परंतू जर मला फक्त भगवंताच्या भेटीचीच वासना असेल तर काय होईल? उत्तर सोपे आहे. भगवंत हा जन्ममृत्यातीत आहे. म्हणजेच अशी त्याच्या भेटीची वासना मला मोक्षच देणारी असाणारी च आहे.

अभंगात तुकाराम महाराज हेच सांगताहेत की अशी वासना आता मनामधे यायला हवी व म्हणुन आता पंढरीची वाट धरा अर्थात सगूण भगवंताच्या स्मरणाची स्वत:ला सवय लावा. त्याचे स्मरण हेच आनंदाचा मुख्य स्त्रोत आहे. महाराज स्वता:चेच उदाहरण देऊन
सांगताहेत की मला जसा पांडुरंगाच्याच नामस्मरणाचा छंद लागला आहे तसा तुम्ही स्वत:ला नामस्मरणाचा छंद लावून घ्या.

ह्या पुढचा दुसरा अभंग आपणा सर्वांनाच असा दिलासा देतो आहे की जरी आतापर्यंत आपण नामस्मरण केले नसले तरीपण हरकत नसावी. जन्म व्यर्थ गेला की काय अशी चिंता करू नये. घाबरून जाऊ नये.

दुसîrÉÉ अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-
अभंगाच्या १ व २ ह्या कडव्यांमधे महाराज म्हणताहेत की : हे हरी हे बरे झाले की मला अजून मृत्यू आलेला नाही. येथपर्यंत म्रुत्यू पासून वाचलो हे फार बरे झाले. आता जे कांही आयुष्य उरले आहे ते मी तुम्हाला समर्पण करतो आहे.

( ही काळाचीच कृपा आहे की ) आजपर्यंत काळाने मला अवसर दिला आहे. त्यामुळे माझ्या आयुष्याचा नाश झालेला नाही. आत जे पूर्वी मी घालवले ते आयुष्य़ जरी फोलपटाप्रमाणे व्यर्थ गेले तर जाऊदे. निदान आता तरी मी बाकी उरलेले आयुष्य आहे त्त्याचा योग्य उपयोग करेन. व मला जे काय साधायचे आहे ते साधून घेईन.

येथेच महाराज आपल्याला स्वत:च्या आतापर्यंत गेलेल्या आयुष्याचा आढावा घ्यायला प्रवृत्त करताहेत. आपल्यासर्वांनाच माहीत आहे की मृत्यू कोणालाही कधीही येऊ शकतो. तसेच फक्त ह्या नरदेहामधेच आपल्याला योग्यरीत्या वागून नरदेहाचे सार्थक करून घेता येते.

जो योग्य प्रयत्न करून ह्याच देहामधे मुक्ती मिळवतो त्याला पुढचा जन्म कसा येईल ह्याची काळजी करण्याची खरे तर आवश्यकतच रहाणार नाही. भागवतामधे वर्णन आहे की परीक्षितराजाला ७ दिवस भागवताइकूनच मुक्ती मिळाली. आपल्या जवळ नक्कीच सात दिवसांपेक्षा जास्त वेळ आहे. तो व्यर्थ घालवायचा नाही एवढे समजले की पुरे होते.

मागच्या अनेक अभंगांच्या विवरणातून एक मुद्द स्पष्ट होतो की जो माणूस फक्त देहसुखाच्याच मागे धावत असतो त्याला अनेक जन्म घ्यावे लागतात. कारण एका वासने-पूर्ती नंतर मिळालेल्या भोगांची आठवण रहाते. ह्या आठवणीलाच वासनेचे बीज-रूप होणे म्हणताता येते. कधी कधी असे बीज ह्याच जन्मी फळाला येते. कधीकधी तसेच रहाते व त्यामुळे व पुढच्या जन्माची तयारी नकळत होते. ह्या वासना अनेक प्रकारच्या असता, उदाहरणार्थ :- शरीरसुखाबद्दलच्या, उत्तमोत्तम खायला मिळावे, घरदारा असावे, मान कीर्ती मिळावी , सूड घ्यावा , बदला घ्यावा अशा वासना, संपत्ती मिळावी, सर्व जग पहावे अशा वासना, ; इत्यादी. यादी जेवढी करावी तेवधी लांबतच जाईल.

पण जर माणूस जागा झाला व त्याला कळले की फक्त भगवंताची भेट होण्यातच खरे जीवन सार्थक आहे तसेच त्याला हे पण कळते की सर्व मानपान वगैरे तात्पुरतेच असतात. कांहीकाळानंतर ते सर्व विसरले जातात. त्यांच्यापासून मिळणारा आनंद वा दु:ख ही पण तात्पुरती अर्थात नाशवंतच असतात.
म्हणुनच खरा भक्त ह्या सर्वांची तमा बाळगत नाही. हाच मुद्दा अभंगाच्या शेवटच्या कडव्यामधील " आता देहासंबंधीचे जे मान-दंभ ईत्यादी अपचार आहेत व त्यांच्यामुळे मिळणारे सुख आहे त्याला आग लागॊ ! मी ते मिळावे म्हणून प्रयत्न करणार नाही " ह्या चरणांमधे आलेला आहे.

ह्या जागे होण्याबद्दल उद्‍गार अभंगाच्या ३ कडव्यामधे दॄष्टांत देऊन सांगितले आहेत. .
येथे तुकाराम महाराज म्हणतात की
) जसा कोणी एखादा पाण्यात पडून बुडला पण नंतर तो किनाîrÉÉ ला लागला की त्याचे बुडणे खॊटे ठरते, किंवा
) स्वप्नामधे जर दु:ख झाले , ते दु:ख जागे झाल्यावर शिल्लक रहात नाही,
) जेवताना शेवटचा घास जर गॊड असेल तर मग आधी खाल्लेल्या अन्नाची चव उरत नाही;
तसेच एकदा कां भगवंताच्याभेटीचे सुख मिळाले की बाकीची सर्व सुखे मिळमिळीत होतात. त्यांची आसक्ती रहात नाही. म्हणून भगवंत भेटीची तळमळ लागणे हेच खरे जागे होणे होय.

असा जागा झालेला माणुस सतत भगवंताच्याच स्मरणात असतो. त्याचे भगवंताशी प्रेमाचे नाते जुळते. ह्या नात्याचे स्वरूप कधी मैत्रीचे ( अर्जून व कृष्णाचे ) , दासाचे ( समर्थ रामदास ) , पती-पत्नी चे ( मीराबाईंचे ) , घरमालक व चाकराचे ( एकनाथहाराज व श्रीखंड्याचे ) असे असते.
असे नाते जडले की भगवंत अशा भक्ताचा योगक्षेम वहातो. शरणागत भक्तांचे रक्षण करणे असे भगवंताचे कौतुक आहे
महाराज तर म्हणताहेत की जरी भक्तामधे कांही दोष असले तरी पण सुर्याचा उदय झाल्यावर जसा अंधाराचा नाश होतो ; तसेच एकदा कां भगवंताशी नाते जुळले की सर्व दोषांचे निरसन होते.

ह्या स्वानुभवाच्या जोरावरच महाराज अभंगात सांगतात की हे भगवंता ,मी हांक दिल्याबरोबर तुम्ही धावून आलात व माझे संकटामधे तुम्ही रक्षण केले आहे. मी तुम्हाला शरण आलो आहे.

अभंगाची शिकवण :-

थोडक्यात अशी शरणागती साधणे व नामस्मरण करणे हे दोन उपाय ह्या अभंगांद्वारे आपल्या सर्वांनाच ह्या मनुष्य जीवनाचे सार्थक करण्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितले आहेत.

ह्यासाठी समर्थ म्हणतात तसे संसार त्याग न करितां ।प्रपंच उपाधी न सांडितां । जनामधे सार्थकता । विचारेची होये ॥

येथे विचार म्हणजे विवेकाने खालील प्रमाणे आचरण करणे होय.
भगवंता विषयी अनन्य भाव ठेवून जगामधे वावरणे. त्यासाठी
) जमेल तेवढे वाचेने सतत भगवंताचे नाम जसे " श्रीराम, ॐ नम: शिवाय ईत्यादि घेणे.
) भगवंतच सर्व कर्ता-करविता आहे हे ध्यान मधे ठेवून आपल्याकडे जे काम येते ते त्याचीच पूजा करतो आहे ह्या भावनेने नीटपणे करणे.
) तसेच ह्या जगामधे जे जे कांही आहे उदाहरणार्थ आपल्याजवळ असलेली संपत्ति, आपली मुलेबाळे , घरदार ईत्यादी सर्वकांही , त्याचा खरा स्वामी भगवंतच आहे हे समजून रहाणे, समाधानी वृत्ती ठेवणे.
) भगवंत सर्वभूती आहे हे समजून प्रत्येकाबरोबर प्रेमाने ,नीती न्यायाचा व्यवहार करणे.,
असा अर्थ आपण घेऊन जर स्वत:ची वागणूक ठेवावी ,तर मग आपोआपच जन्मसार्थक होईल हीच शिकवण येथे आहे असे मला वाटते.









0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home