Saturday, February 28, 2015

73 A post in Marathi.राम म्हणें वाटचालीं । यज्ञ पाउलापाउली ।
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.com

राम म्हणें वाटचालीं । यज्ञ पाउलापाउली ।
धन्य धन्य ते शरीर । तिर्थव्रतांचे माहेर ॥ १ ॥
राम म्हणें धंदा कररितां। सुखसमाधि त्या सदा ।
राम म्हणें ग्रासोग्रासी । तोचि जेविला उपवासी ॥ २ ॥
राम म्हणें भोगी त्यागी । कर्म न लिंपे त्या आंगी ।
ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे तोचि जीवमुक्त ॥ ३ ॥

अभंगाच्या मागची पार्श्वभूमी :-

आधीच्या post मधे "झाली होती काया बहूत मळीण " हा अभंग आपण पाहिला. त्याच्या शेवटी असे म्हटले होते की पुढच्यावेळी महाराजांचि साधना कशी झाली त्याचे वर्णन करणारा अभंग पाहू
म्हणुऩच असे वर्णन करणारा अभंग येथे घेतलेला आहे.

सर्व परमार्थसाधनाचे वर्म स्वत:मधील " अहंभाव – मी पण " लयास जाण्यात आहे. अहंभाव संपला की मन उन्मन होते व जीव मुक्त होतो असेच सर्व संत तसेच शास्त्रे सांगतात. हे आत्मनिवेदन भक्तीमुळे घडते. " आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय ही माहिती प्रथम खाली थोडक्यांत दिली आहे..

ज्याला मुक्ती हवी आहे त्याच्याकडून नवविधा भक्तींपैकी कोणतीहि भक्ती झाली की असा साधक शेवटी भक्तीच्या शेवटच्या पायरीवर पोहोचतो. ही शेवटची पायरी म्हणजे " आत्मनिवेदन भक्तीचि पायरी " होय.
निवेदन करणे म्हणजे समर्पण करणे, शरणागत होणे.
ही भक्ती तीन स्तरांवरून घडते/ केली जाते. जड आत्मनिवेदन, चंचळ आत्मनिवेदन व निश्चळ आत्मनिवेदन.

जड आत्मनिवेदन:- साधारणत: आपण वस्तू व व्यक्ती यांच्यावर आपला मालकी हक्क समजतो. जसे माझे घर, माझा मुलगा ईत्यादी.
त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींबद्दल आसक्ती निर्माण होते. अशी आसक्तीच बंधनाला कारण असते हे आपण आधीच्या अनेक अभंगांवरील विवरणात पाहिले आहे. ह्या आसक्तीमधून बाहेर येण्याचा सोपा उपाय म्हणजे विरुद्ध विचार करणे होय अर्थात आपण ह्या सर्वाचे विश्वस्त आहोत हे समजून वागणे. विश्वस्ताला वस्तूंची सर्व काळजी घ्यावी लागते. तसे संसारामधे वागणे असणे; म्हणजेच " आहे तितुके देवाचे " अर्थात जे जे आहे त्याचा मालक भगवंतच आहे हे समजून जगामधे वागणे, म्हणजे जड आत्मनिवेदन.
अर्थात ज्याला असे वागावे असे वाटते त्याला एवढे नक्कीच समजलेले ( तर्काने ) असते की सर्वांभूति भगवंताचा वास , अस्तित्व आहे. अनुभव नसतो पण संतवाक्यांवर विश्वास ठेवल्याने सर्वांभूति भगवंत आहे हे पटलेले असते
चंचळ आत्म निवेदन:- आपण जर हे समजून घेतले की " जे जे घडते ते खरेतर भगवंताच्या ईच्छेप्रमाणेच होत असते.” तर आपल्या मनाप्रमाणे जर कांही घडले नाही तर मन दु:खी होणार नाही .
उदाहरणार्थ : आपल्याला कधीच आजारी पडावेसे वाटत नाही तरीही प्रत्येकजण कधीना कधी आजारी पडतोच. ह्याचे कारण म्हणजे भगवंताची इच्छा सर्वांच्या अंतर्यामी राहून तोच सर्व कार्य करवून घेत असतो.
विषय तसा मोठा आहे. म्हणुन एवढॆच येथे सांगता येते की " कर्ता करविता भगवंत" हे समजून जगात वावरणे म्हणजे चंचळ आत्मनिवेदन.

. वर वर्णन केलेल्याप्रमाणे वागणे घडू लागले की अहंकार कमी व्हायला लागतो. श्री.रामकृष्ण परमहंस म्हणतात तसा सर्वांचाच अहंकार नष्ट होत नाही पण ठाकुरजी म्हणुनच म्हणतात की त्यापेक्षा स्वत:ला " मी भगवंताचा दास आहे असे समजायला काय हरकत आहे.” अशी दासवृत्ती असणे म्हणजेच जड व चंचळ आत्मनिवेदन भक्ती करणे होय.

निश्चळ आत्मनिवेदन ही भक्ताची होणारी मानसिक स्थितीआहे व ही स्थिती सद्‍गुरूकृपेचा वर्षाव झाल्याबरोबर होते. ह्या स्थितीलाच मोक्ष म्हणता येते.
ह्या पार्श्वभूमिकेवरून आपल्याला अभंगचा अर्थ समजणे सोपे जाते.

अभंगाचा शब्दार्थ :-
राम राम म्हणत मी माझे सर्व कर्म करतो आहे त्यामुळे पाऊलोपाऊली माझ्या हातून यज्ञ घडतो आहे. ह्या क्रियेमुळे शरीरच तीर्थरूप झाले आहेव धन्य झाले आहे॥ १॥
सर्व कामे करतान मी रामनाम म्हणतो म्हणुनच ह्याक्रियेमुळे मी सतत समाधीसुख भोगतो आहे. प्रत्येक घासाला तुझे नांव घेतल्यामुळे जेवण करूनही उपवास घडतो आहे. ॥ २॥
सतत भोग भोगताना, त्याग करताना ;रामाला स्मरल्यामुळे कर्मबंधन उरत नाही. तुका म्हणतो की असे रामनाम जपणारा जीवन्मुक्तच असतो. ॥ ३॥

अभंगाच्या अर्थाचे विवरण:-
अभंगाचे चरण जर वेगळ्या क्रमांकाने घेतले तर आपल्याला कांही महत्वाचे मुद्दे हाती लागतात. .
राम म्हणें वाटचालीं । यज्ञ पाउलापाउली ।
राम म्हणें धंदा कररितां। सुखसमाधि त्या सदा ।
राम म्हणें ग्रासोग्रासी । तोचि जेविला उपवासी ।
धन्य धन्य ते शरीर । तिर्थव्रतांचे माहेर ॥ १ व २ ॥
अभंगाच्या ह्या चरणांमधे महाराज म्हणतात की ते सतत रामनाम जपत असतात व संसाराची वाटचाल करत असतात. तसेच त्यांच्या हातून यज्ञ घडतो आहे. ह्याचा अर्थ हाच की त्यांच्या मनमधे ही जाणिव सतत आहे की त्यांच्याकडून रामच सर्व कर्मे ( धंदा ) करवून घेत आहे. थोडक्यांत त्यांचे सर्व कर्म निष्काम भावाने होते आहे. असे कर्म करणे म्हणजेच यज्ञ करणे होय.
ह्याचा मुख्य फायदा हाच आहे की
आपल्याला कर्म फळाची आशा नसल्याने फळ चांगले मिळाले तरी चालते व मनाप्रमाणे झाले नाही तर वाईट वाटत नाही.
एकूण सतत शांतीच्या भावनेमधे आपले मन राहील व ह्यालाच महाराजांनी " सुखसमाधी" ह्या विशेषणाने संबोधले आहे.

अभंगातल्या "जेवण" ह्या शब्दाचा अर्थ "पंचेंद्रियांद्वारे शरीराला मिळणारे भोग असा घ्यायचा आहे. जसे कानांना गोड गाणे आवडते. जीभेला सुग्रास जेवण आवडते. दोळ्यांना सौन्दर्य तर नाकाला सुगंध, त्वचेला स्पर्शसुख आवडते.
ज्याचे मनी सतत " रामच सर्व देणारा " ही भावना असेल त्याला गॊडाचा जसा आनंद मिळेल तसाच कडू खावे लागले तरीपण होईल. त्याचे समाधान कधीही भंग होणार नाही. ह्यालाच तुकाराम महाराजांनी जेवून न जेवणे म्हटले आहे.
कर्म करताना जर "कर्ता करविता राम" हे जर सतत ध्यानी ठेवून केले तर हा पण एक यज्ञ होईल. ह्या यज्ञाचे फळ भगवद्‍भेट हेच आहे. असे वागणारा सर्व तीर्थांप्रमाणेच पवित्र असतो हे येथे सांगितले आहे. अशा सद्‍गुणी व्यक्तीचा सहवास आनंद देणाराच असतो सर्वांनाच अशी व्यक्ती हवीहवीशी वाटते.

अभंगाचे शेवटचे चरण वरील मुद्देच वेगळ्या शब्दांत थोडक्यात सांगणारे आहेत.
राम म्हणें भोगी त्यागी । कर्म न लिंपे त्या आंगी ।
ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे तोचि जीवमुक्त ॥ ३॥
"जो कोणी सर्व कर्ता, करविता व तसेच भोक्ता भगवंत आहे मी नाही हे समजून ह्या जगामधे वागेल; तोच ह्याची देही ह्याची डोळा मुक्त होईल " ; अशी ग्वाहीच अभंगाच्या ह्या चरणांमधे तुकाराम महाराजांनी येथे दिलेली आहे.

अभंगाची शिकवण : -
संत कोणतेही असोत,जसे तुकाराम महाराज, समर्थ रामदास, कबीर, मीराबाई ईत्यादी. सर्व संतवचनाचे वैशिष्ठ्य हेच असते की प्रथम त्यांनी स्वत: अनुभव घेतला व नंतरच आपला अनुभव शब्दांकित केला आहे.

संतांच्या वचनांवर विश्वास ठेवून वागल्याने जीवाचे कल्याणच होते हे आपण सर्वच समजू शकतो. म्हणुनच आपण सुद्धा महाराजांच्या वरील उपदेशाप्रमाणे वागून आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे. हीच शिकवण येथे मिळते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home