Saturday, February 7, 2015

Post No 72 A Marathi झाली होती काया । बहुत मळीण देवराया ।
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.com
 For English  Readers a separate post is being added..

झाली होती काया । बहुत मळीण देवराया ।
तुझ्या उजळली नांमें । चित्त प्रक्षाळिले प्रेमें ॥ १ ॥
अनुतापें झाला झाडा । प्रारब्धाचा नितोडा । नितोडा == संबंध तुटणे
तुका म्हणें देह पायीं । ठेवुनि झालो उतराई ॥ २॥

अभंगाचा अर्थ समजण्यासाठीची पार्श्वभूमी :-

संत कसे असतात तर पावसासारखे! सर्वांचे कल्याण व्हावे म्हणुन संतांचा उपदेश असतो. पाऊस सगळीकडे पडतो पण जेथे सुपीक जमीन असते तेथे बी पेरलेले असले तर उत्तम पीक मिळते. तसेच मन जर शुद्ध असेल तर संतांच्या उपदेशाचा परीणाम ताबडतोब होतो. परिणाम म्हणजे सद्‌गुरूकृपा हाच होय. ज्याच्यावर सद्‍गुरूकृपा होते तोच मुक्त होतो. नरजन्माची सार्थकता म्हणजे सायोज्य मुक्तिच जी ह्याच जन्मात मिळते तीच आहे . स्वत: भगवान श्रीकृष्णांनी व सर्वच संतांनी सांगितले आहे. फक्त नरदेहधारी जीवालाच ही संधी मिळालेली आहे.
अशी हि स्थिती असणारा पुरुष कसा असतो ते ह्या अभंगावरून आपल्याला थोडेसे कळते.

साखर खाल्य़ाशिवाय तिची गोडी कळत नसते. तसेच अशी आत्मज्ञानी स्थिती म्हणजे काय हा अनुभवाचा भाग आहे.
एवढे मात्र खरे की ही स्थिती संपूर्ण , सतत न भंगणारे समाधान देणारी आहे. शिवाय अशी स्थिती आली की जन्ममृत्य़ू च्या चक्रामधून जीवाची सुटका झालेली असते. म्हणुनच असे समाधान आपल्याला मिळावे असे प्रत्येकालाच खरेतर वाटत असते.

अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-
सुरवातीस पहिल्याचरणामधे महाराज म्हणतात की त्यांची काया म्हणजे शरीर मळलेले होते.
येथे आपण समजू शकतो की बाह्य शरीर स्नान केल्याने स्वच्छ होते. पण मनाचे काय? जर मन खाणे, पिणे, वैषयिक सुखे भोगणे व त्याच्याच आठवणीत रमलेले असेल तर मन " मळलेलेच " म्हणावे लागेल. असे वासनांनी भरलेले मन असेल तर शरीर मळलेले अस्वच्छच म्हणावे लागेल. वासनांच्यामुळेच आपण सर्वजण जन्ममृत्यूचक्रा व त्यामुळेधे फिरत आहोत व सुखदु:खाच्या प्रवाहात वाहात आहोत हे आपणा सर्वांनाच आता माहीत आहे.

नामस्मरणाची साधना तुकाराम महाराजांनी केली व त्यांचे मन ह्या साधनेमुळे शुद्ध झाले आहे असे महाराज अभंगाच्या पुढच्या चरणात आपल्याला सांगताहेत.
ह्या चरणातच महाराज म्हणतात की " प्रेमे चित्त प्रक्षाळिले " ., अर्थात महाराजांनी नामस्मरण प्रेमाने केलेले आहे. थोडक्यांत अर्थ हाच की आपले नामस्मरण ही एक क्रिया Mechanical action म्हणुन नसावी तर त्यांत भगवंताचे प्रेम भरलेले असावे.
हे प्रेम कसे ह्याबद्दल आपण पूर्वीच्या अभंगात श्री रामकृष्ण परमहंसांच्या एका वचनामधे पाहिले आहे. आईचे आपल्या बाळवर, पत्नीचे आपल्या प्रिय पतीवर, कवडीचुंबकाचे पैशावर जसे असते त्यापेक्षा अनेक पटीने भगवंतावरचे प्रेम असावे. असा हा दॄष्टांत आहे. जर आपण समजून उमजून नियमितपणे भगवंतास आठवले तर असे प्रेम निर्माण होते असे श्री. गोंदवलेकर महाराज सांगतात.

अभंगाच्या पुढच्या ( चरण ३) मधे हे "समजणे -उमजणे " अर्थात आपल्या पूर्वीच्या वागणूकीचा ( सर्व काळ विषयांच्यामागेच धावत असणे व भगवंताला त्याने कांहीतरी द्यावे ह्या भावनेने पूजणे ) पश्चाताप पावणे होय. असा पश्चाताप होऊन जर भगवंताला शरण गेलॊ तर तो आपली माऊलीच असल्याने आपल्याला नक्कीच जवळ घेत असतो.
आपल्याला फक्त एक पाऊल पुढे टाकायचे असते हाच अर्थ येते समोर येतो.

अभंगाच्या शेवटच्या चरणामधे महाराज म्हणतात की मला असा पश्चाताप झाला होता ( व त्यामुळे पांडूरंगच माझा त्राता आहे ह्या भावनेने अत्यंत अनन्यभावाने मी त्याचे स्मरण केले ). ह्या मुळे माझे प्रारब्धाचे भोग संपले. मी त्याचाच चरणी हा देह अर्पण केला आहे आणी त्याचा उतराई झालो आहे.

आपण ह्या जन्मामधे जी कांही सुखे वा दु:खे भोगत असतो ती म्हणजे पूर्वजन्मी केलेल्या पुण्य-पापांचेच फळ असते. ह्या शिवाय आपण आताच्या जन्मामधे पण ह्यात भर टाकलेलीच आहे.
पण भगवंताचे अनन्यभावे स्मरण केल्यामुळे हे सर्व भोग आता संपले आहेत. मी हा देह भगवंताला अर्पण केला आहे. ( ह्याचा अर्थ हाच की महाराजांचे " मीपण " = " अहंकार " पूर्ण लयास गेलेला आहे. ) .
जर आपण तुकाराम महाराजांचे चरीत्र पाहिले तरच त्यांचा मी पूर्ण पणे कसा लयास गेला होत ते कळते. ते जीवन्मुक्तच होते.

श्री. दासबोधामधे द.९स३ "नि:संदेहनिरूपण" मधे असा जीवन्मुक्त कसा असतो त्याचे वर्णन येते. समर्थाचंचे बोलणे पण तुकाराम महाराजांच्या प्रमाणेच अनुभवाचे ( प्रचीतीचेच) आहे. असा पुरुष अकर्ता,अभोक्ता,अलिप्त पणे संसारात वावरत असतो. त्याला अंतर्यामी स्वत:च्या स्थितीची पूण जाणीव असते. व त्याचे वागणे "उरलो उपकाराकरिता" असेच असते. प्रारब्धाप्रमाणे जे जे भोग यायचे त्यांनी तो स्वत:च्या आत्मस्थितीपासून विचलित होत नाही. स्वामी विवेकानंद, श्री रामकृश्ण परमहंस, शेगावचे श्री. गजानन महाराज, लोकमान्य टिळक अशी बरीच नांवे आपल्याला माहित आहेत.असो.
येथे असे म्हणावेसे वाटते की आपल्याला सध्याच्या अज्ञानावस्थेतून ज्ञानवस्थे कडे जायचे आहे कारण असे केले तरच शाश्वत समाधान म्हणजेच मोक्ष मिळेल.अन्यथा नाही.
शंकराचार्य भजगोविंदम्‌ स्तोत्रमधे सांगतात तसे 
कुरुते गंगा सागर गमनम्‌ । व्रत प्रतीपालन अथवा दानम्‌ ।
ज्ञानविहिनं कर्ममनेन । मुक्तिर्नभवती जन्म शतेन ॥
श्लोकाचा अर्थ:- जरी गंगास्नान, सागरस्नान, अनेक व्रतवैकल्ये किंवा दानधर्म केला, तरी जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत शंभर जन्म जरी घेतले तरी मोक्ष मिळणार नाही.

येथे असा प्रश्न उपस्थित होईल की आपल्याला हे कसे जमणार? व त्याचे उत्तर एकच आहे की आपल्या हाती प्रयत्न करणे , नीती नियमांप्रमाणे वागणे नक्कीच आहे.

झोपण्यासाठी आपण अंथरूणावर पडणे हा प्रयत्न आप्ण रोज करतच असतो. झोप अमूक एक वेळानेच लागली असे नक्की कोणीच सांगू शकत नाही पण आपण रोज झोपी जातोच.
तद्वतच प्रयत्न म्हणजे भगवंताचे नामस्मरण किंवा आपल्याला जी साधना करायची ती नियमितपणे करणे व बाकीचे त्याच्या मर्जीवर सोडुन देणे एवढे आपल्याच हाती आहे.

अभंगाची शिकवण :- मला वाटते की असे प्रयत्न आपण करावे हीच ह्या अभंगाची शिकवण आहे.

ह्या प्रयत्नांचे स्वरूप सांगणारा अभंग पुढच्या post मधे घेणार आहे. त्यापूर्वी वाचकांनी आपले विचार जरूर कळवावे हीच येते विनंती.




1 Comments:

At February 9, 2015 at 11:35 PM , Blogger Unknown said...

खुप छान , तुझा blog पहिल्यांदाच वाचला बरे वाटले. मी स्वतः पूजाअर्चा करीत नाही पण या प्रकारचे तसेच इतर वाचन करतो . तू सुरु केलेला उपक्रम खूपच चांगला आहे .
श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले यावर तुझा कितपत विश्वास आहे. कारण शरीर नश्वर आहे आणि त्याचा त्याग इथेच करावा लागतो .
तुझे प्रांजळ मत काय आहे.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home