Tuesday, March 11, 2014

मराठी post ६० अभंग : आता कोठे धावे मन  dt 11th Mar 14.
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.इन
Contact mail address is rgphadke@gmail.com

आतां कोठे धावे मन । तुझे चरण देखेलिया ॥ १॥
भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद ।। २॥
प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥ ३॥
तुका म्हणे आम्हां । विठ्ठल घोगें खरें माप ॥ ४॥

अभंगाचा शब्दार्थ :-
हे भगवंता, मी तुझ्या चरणाचे दर्शन घेतले आहेत; तर मग आतां माझे मने कोठल्याठिकाणी धांव घेईल? अर्थात माझ्या मनास आत ईतर कांहीच सुचत नाही आहे. ॥ १॥
ह्यामुळे माझा सर्व शीण नष्ट झाला आहे व मी आनंदाचाच अनुभव घेतो आहे. ॥ २॥
तुझ्याविषयी प्रेमातच मनाने बुडी मारली आहे, व नाम घेण्याची माझ्या जिभेला गॊडी लागली आहे ॥३॥
तुका म्हणतो की सर्व सुखाची मोजणि करायची तर विठ्ठल हेच सर्वांत मोठे माप आहे व तेच आमच्यासाठी योग्य, खरे आहे ॥ ४॥

अभंगा मागची भूमिका:-

मागच्या अभंगात जसा तुकाराम महाराजांच्या ब्रह्मरुपतेच्या नंतरचा अनुभव शब्दांकित होता तसाच ह्या अभंगात महाराजांचा स्वानुभव वेगळ्या शब्दांमधे महाराजांच्या प्रासादिक वाणीतून पुन: प्रगट झालेला आहे.
महाराज जरी ब्रह्मरूप झाले आहेत तरी ते आपल्यासारख्यांसाठी पुन: द्वैतामधे आलेले आहेत. ( ह्या अवस्थेलाच तुर्यावस्था असे नांव आहे. ह्या अवस्थेमधे बाह्य सृष्टीचे ज्ञान असते तसेच परब्रह्माशी एकरूपत्व पण असते. आपण जेंव्हा ॐ चा उच्चार करतो तेंव्हा अत्यंत थोडाकाळ ह्या अवस्थे मधे जातो. ध्यान करण्य़ाच्या क्रियेमधे हा काळ अभ्यासाने लांबत जातो. मांडुक्य उपनिषदामधे ह्यावर सविस्तर चर्चा आहे.

अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-
तुकाराम महाराज जरी द्वैताकडे आलेले आहेत तरी त्यांचे मन मात्र त्या आनंदातच रंगलेले व म्हणून महाराज पहिल्या चरणामधे म्हणतात की हे देवा पांडुरंगा तुझ्या चरणांचे दर्शन झाल्यावर आता माझे मन सतत त्याठिकाणीच रमलेले आहे. माझ्या मनाची इकडे तिकडे फिरण्याची सवय पूर्णपणे सुटली आहे. आता मला फक्त तुमचेच चरण दिसत आहेत.

ह्या आनंदाची कल्पना करायची, आनंदाचे स्वरूपप कसे असते ते समजायचे तर आपला गाढ झोपेचा अनुभव आहे त्याचा उपयोग दृष्टांत ( हा दृष्टांतपण खरेतर अपूराच आहे ) म्हणून करता येतो. आपण गाढ झोपेतून जागे झालॊ की थोडावेळ आपली अशीच स्थिती असते. कारण झोपेमधे आपण सुषुप्ति अवस्थेत जातो व त्यावेळी आपण आनंदाचाच अनुभव घेतो. त्याची आठवण जागे झालो तेंव्हा येते.पण जागे झाल्यावर मन परत व्यवहार करू लागते व विचलित होते. असो. संतांचे तसे नसते. ते ब्रह्मानंदातच असतात. तुकाराम महाराजांचे मन फक्त एका विठ्ठलाच्या चरणाचेच स्मरण करते आहे.

अभंगाच्या २ îrÉÉ चरणामधे अशा स्थितिच्यामुळे काय घडले/घडते त्याचे वर्णन आहे.

जेंव्हा मन वि़चलित असते तेंव्हा ( टोकाचे विचार काळजी केली की) मनाची अशी स्थिति होते. मनाच्या ह्या स्थितिमुळे अनेक आजार होतात हे आता सिद्ध झालेले आहे. माणसाच्या मनाला शीणभाग म्हणजे थकवा तेंव्हाच येतो. कांही झोप येणारी औषधे देऊन मानसोपचार तज्ञ ह्या विचलित स्थितीवर उपचार करतात.
पण भगवंताच्या चरणाठायी मन एकदा गुंतले की मग असा किंचितही थकवा येत नाही उलट असला तर तो दूर होतो. तुकाराम महाराजांनी हेच दुसîrÉÉ अभंगाच्या चरणामधे म्हटले आहे.

अभंगाचा तिसरा चरण आपल्या रसनेची स्थिती वर्णन करणारा आहे.
भगवंताचे निस्सिम प्रेम मनामधे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे जिभेला त्याचेच नाम घेण्याचा चाळा लागला आहे. दुसरे कांहीच तिला गॊड लागत नाहीये.

येथे पण एक व्यवहारातला म्हणुनच अपूरा दॄष्टांत घेता येतो. जर आपण फार गॊड वस्तू खाल्ली तर त्या गोडीचा अनुभव मना मधे अत्यंत घट्ट जागा धरून बसतो. ह्या संस्कारामुळे मनास तीच वस्तू सतत खावी असेच वाटत राहते.
(पण एक वेळ अशी येते की त्या वस्तूची आंस संपते. मग तीच वस्तु निदान तात्पुरती नकोशी वाटते.
ह्यालाच Law of Diminishging return असे नांव आहे.)
तुकाराम महाराज म्हणतात की माझा जिभेला विठ्ठलनामच्या गोडीचा अनुभव आला आहे. आता माझ्या रसनेला नामाशिवाय दुसरे कांही नको आहे. ( येथे पारमार्थिक अनुभव नेहमीपेक्षा वेगळा कसा हे पण स्पष्ट झाले!) विठ्ठलनामस्मरणाला किंवा कोणत्याही नामास्मरणाला Law of Diminishing Return लागू होत नाही .

अभंगाच्या शेवटच्या चरणामधे हा मुद्दाच स्पष्ट होतो. महाराज म्हणताहेत की विठ्ठल नामाचे स्मरण केल्याने जे सुख मोजायचे तर त्यासाठी दुसरे कोणतेही माप उपयोगी नाही. स्वस्वरूपाचे ज्ञान झाले व ब्रह्मानंदाचा अनुभव आला. परब्रह्माशी एकरूपता आली. हा आनंद अखिल ब्रहमांडाला व्यापणारा आहे. त्यासाठी विठ्ठल म्हणजे परब्रह्माएवढेच मोठे माप आहे. थोडक्यांत म्हणायचे तर हा आनंद अवर्णनीय आहे. त्याची मोजणि करणे अशक्यातली गोष्ट आहे. ही मोजणि करायची तर अशा भक्तालापण ब्रह्मरूपच व्हावे लागेल.

अभंगाची शिकवण:-  :-      
शिकवण हीच की नामस्मरण करून आपणही अशा आनंदाचा अनुभव घेण्य़ास प्रयत्नशील व्हावे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home