Saturday, January 16, 2016

79A post साधूसंतांची लक्षणे सांगणारे तीन अभंग :-
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com


 For English Readers a separate post has been added



साधू- संतांची लक्षणे सांगणारे तीन अभंग :-

अभंग १ ला :-
जे कां रंजले गांजले । त्यांसी म्हणें जो आपुले ॥
तोची साधू ऒळखावां । देव तेथेंची जाणांवा ॥
मृदू सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचे चित्त ॥
ज्यासि आपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ॥
दया करणें जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥
तुका म्हणें सांगू किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥ १ ॥

अभंग २ रा :-
पुण्यपापा ठाव नाहीं सुखदु:खा । हानि लाभ शंका नासलिया ॥
जितां मरण आलें आपपर गेलें । मूळ छेदिलें संसाराचें ।
अधिकार जात वर्णधर्म जात । ठाव नाही सत्य असत्याशीं ।
जन वन भिन्न अचेत चळण । नांही दुजेपण ठावे यांसी ।
तुका म्हणें देह वाहिला विठ्ठलीं । तेंव्हाच घडली सर्व पूजा ॥ २ ॥

अभंग ३ रा :-
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाही तेथें।
बहु दुधड जरी झाली म्हैस गाय । तरि होईल काय कामधेनू ।
तुका म्हणें अंगें व्हावें तें आपण । तरीच महिमान येईंल कळॊं ॥ ३ ॥

अभंगांच्या अर्थाचे विवरण :-

संत कोणाला म्हणावे याबद्दल तुकाराम महाराजांचे जे अनेक अभंग आहेत त्यातील हे तीन अभंग आहेत. आपण जर श्री भगवद्‍गीतेतला १२ वा अध्याय वाचला तर ,  तसेच दासबोधातील संतस्तवन समासात आपल्याला संतांचे वर्णन वाचायला मिळते. तुकाराम महाराजांचे हे अभंग असेच वर्णन करतात.

अभंग १ ला:-
. खरा साधू म्हणजेच संत जो असतो त्याच्या अंत:करणात रंजल्या गांजल्या लोकांबद्दल असीम करूणा असते . तुकाराम महाराजांनी अशा मृदू अंत:करणाचे वर्णन  करण्यासाठी लोंण्य़ाची उपमा वापरलेली आहे. लोणी जसे अंतर्बाह्य मऊच असते तसेच संतांचे अंत:करण असते. म्हणूनच ज्यांचा कोणीही रक्षण करणारा नसतो त्यांचे रक्षण करण्यासाठी असा संतपुरुष नेहमीच तत्पर असतो. सर्वसाधारण माणसे फक्त स्वत:च्या मुलांवरच माया करतात. पण संत पुरूष आपल्या मुलाबाळांवर जेवढे प्रेम करतो तेवढेच आपल्या नोकर मंडळींवर सुद्धा करतो. तो दयेचा सागरच असतो.

एकनाथ महाराजांच्या चरित्रामधे असे प्रसंग आहेत. पूर्वी तीर्थ यात्रा करण्यासाठी लोक उत्तरेत काशीला जात व परत येताना गंगेचे पाणी आणत. हे पाणी दक्षीणेकडील रामेश्वरास जाऊन समुद्रात अर्पण करण्याची प्रथा होती व अजूनही आहे. एकनाथ महाराज काशीयात्रेहून येतांना गंगेचे पाणी घेऊन आले होते व अर्थातच रामेश्वरास जाणार होते. पण गावात आल्यावर गोदावरी नदीच्याकाठावर वाळवंटामधे एक गाढव तहानेने तळमळत असल्याचे पाहिल्यावर त्यांनी स्वत:जवळचे गंगेचे जल त्या तहानेल्या गाढवाच्या तोंडी घातले व अर्थातच मग ते रामेश्वरास गेले नाहीत. असेच प्रसंग आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात आढळतात. महारोग्यांची सेवा MüUhÉÉîrÉÉसंत तेरेसा आपल्या सर्वांनाच माहीत आहेत.
थोडक्यात सांगायचे तर जे संत असतात ते दु:खाने व्याकूळ झालेल्या जनसामान्यांना आपलेच समजतात व अशा लोकांच्या कल्याणसाठी आपले जीवन खर्च करतात.
तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटी म्हणतात की असा संतपुरुष म्हणजेच भगवंताची सगूण मूर्तीच होय.

अभंग २ च्या अर्थाचे विवरण:-

असे हे संतपण कसे अंगी येते? तसेच संतांमधे आणखी कोणती लक्षणे आढळतात? हे सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी स्वत:चेच उदाहरण दिले आहे.

जेंव्हा माणसाला ब्रह्मज्ञान होते तेंव्हा असे असा पुरुष संत म्हटला जातो. अशी व्यक्ती सर्वत्र आपणच आहोत ह्या भावातच सतत असते. त्यामुळे आपपरभाव उरलेलाच नसतो.
अशा पुरुषाला पापपुण्याची बाधा नसते. कारण अशा माणसाचे प्रत्येक कर्म हे निष्काम भावातच घडलेले असते. अर्थातच असे केले तर मला फायदा होईल व असे केले तर माझे नुकसान हॊईल ही भीती अशा पुरुषाच्या अंत:करणला स्पर्श करत नाही. तसेच आपणच सर्वत्र आहोत हा सतत असणारा अनुभवभाव असल्याने अशा पुरुषामधे आपपरभाव समूळ नष्ट झालेला असल्यामुळे वर्ण , जात, धर्म ह्या सर्वाचा पलिकडे असा पुरुष गेलेला असतो. फार काय त्याच्यासाठी जनामधे म्हणजे समाजामधे राहणे किंवा वनामधे राहण्यात पण कांही फरक उरत नाही . तो नेहमीच एकांतातच असतो ( येथे एकांत म्हणजे ब्रह्मभाव अशा अर्थाने हे म्हटले आहे. ) ब्रह्मभावात असल्यामुळे हा देह म्हणजे मी ही ही वृत्तीच उरलेली नसते.
आपण सर्वजण देहभावामधे असल्याने आपल्यामधे जन्म मृत्यू ची भीती असते. पण देहबुद्धीच नसल्यामुळे असा संत जन्ममृत्यातीत अर्थात अमरत्व पावलेला असतो. ह्यालाच महाराजांनी जिवंत असूनही मेल्याप्रमाणे असणे म्हटले आहे.
वै. जोगमहाराजांनी अशा जीवनाला कुंभाराच्या चाकाची उपमा दिलेली आहे. मातीचे भांडे करण्यासाठॊ कुंभार चाकाला गती देतो व भांडे तयार केले की चाकापासून वेगळे ठेवतो. पण चाक फिरतच असते. ते हळूहळू थंबते. तद्वतच ब्रह्मज्य़नी पुरुषाचा देह शरीर सोडून जाईपर्यंत प्रारब्धानुसार जी विहित कर्मे कामे येतात ती करतच राहतो. पण त्या कर्मफळांची त्याला बाधा होत नाही.
हे कसे घडले ते वर्णन करतांना तुकाराम महाराज म्हणतात की मी माझा देहभाव विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला , त्यावेळी मी त्याची पूजा केली. नंतर द्वैतच संपले.

शरीर म्हणजे चल पदार्थ व बाकीचे अचल पदार्थ सर्व कांही मीच आहे हे अनुभवले.

  ह्यालाच सायोज्यमुक्ती म्हणतात. ईतर मुक्ती ह्या तात्पुरत्या पण सायोज्यमुक्ती ही अविनाशी असते. मोक्ष म्हणतात तो हाच.

अभंग ३ च्या अर्थाचे विवरण:-
संत हे ब्रह्मज्ञानी असल्याने आपल्याला त्यांचे वर्णन शब्दांद्वारे करणे अशक्यच असते. साधी साखरेची गोडी तरी कोठे सांगता येते? शेवटी कांही गोष्टी अनुभवानेच कळतात. असो
म्हणुनच तुकाराम महाराज संतामहिम्याचे वर्णन कसे करावे ह्याबद्दल बोलताना म्हणतात की खरेतर संतमहिम्याचे शब्दांद्वारे वर्णन करताच येत नाही.
हे कार्य अत्यंत दुर्गम आहे असे समजावे म्हणून एक दृष्टांत येथे महाराजांच्या अभंगात येतो. महाराज म्हणतात की कितीही दूध दिले तरी एखाद्या गाय वा म्हशीला कामधेनू म्हणता येत नाही. कामधेनू सर्व ईच्छा पूर्ण करते. भरपूर दुध देणारी गाय सर्व ईच्छा पूर्ण करू शकत नाही.
अर्थात ही शेवटी एक उपमाच /  हा एक दृष्टांतच आहे व म्हणुनच अपूराच आहे. पण समजावे म्हणून संत असे व्यवहारातील दृष्टांत देतात. असो. म्हणूनच अभंगाच्या शेवटी महाराज स्पष्टच सांगताहेत की जर तुम्हाला संतमहिमा काय आहे हे समजून घ्यायचे असेल तर तुम्हालाही संत म्हणजे ब्रह्मज्ञानी व्हावे लागेल.

ह्या पुढच्या पोस्ट मधे संतांचे कार्य काय असते ईत्यादी मुद्द्यांवरच्या अभंगावर करणार आहे. व त्यानंतरच आपल्याला ह्यातून काय शिकवण मिळते ते लिहिणार आहे.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home