Sunday, August 14, 2016

84th Marathi post with 3 hymns. 1) बहु जन्म केला लाग। तो हा भाग लाधलों ।
                    2)दुर्बुद्धी ते मना । कदा नुपजॊ नारायणा ॥
                                        3) देवावरी भार । वृत्ति अयाचित सार ॥
 Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com

बहु जन्म केला लाग। तो हा भाग लाधलों ।| १ ॥
जीव देईन बळी । करीन होळी संसाराची ॥ २ ॥
गेलें मग नये हातां । पुढची चिंता वाटतसे ॥ ३॥
तुका म्हणें तांतड करू । पाय धरूं बळकट ॥ ४॥

दुर्बुद्धी ते मना । कदा नुपजॊ नारायणा ॥ १॥
आतां मज ऐसें करी । तुझे पाय चित्ती धरी ॥ २॥
उपजला भावों । तुझ्या कॄपें सिद्धी जावो ॥ ३ ॥
तुका म्हणें आतां । लाभ नाही परता ॥ ३॥

देवावरी भार । वृत्ति अयाचित सार ॥ १ ॥
देह देवाचें सांभाळी । सार योजे यथाकाळी ॥ २॥
विष्वासी निर्धार । विस्तरारिल विश्वंभर ॥ ३॥
तुका म्हणें व्हावें । ब:ळ एकचि जाणांवें ॥ ४॥



अभंगांचा शब्दार्थ :-

अनेंक जन्मी परमार्थाचा पाठलाग केल्याने अशा प्रकारचा भाग प्राप्त झाला.
आतां मी परमार्थाकडे जीव बळी देऊन सर्व संसाराची होळी करून टाकीन.
एकदां कां हा नरदेह गेला म्हणजे तो पुन: मिळ्णर नाही ; या विषयीची मोठी काळजी लागली आहे.
तुका म्हणतो की त्वरा करून विठोबाचे पाय हृदयांत बळकट धरून ठेवू .
हे नारायणा , माझ्या मनात कधी वाईट बुद्धी उत्पन्न होऊं देऊं नकोस.
माझ्या चित्ताने तुझे पाय धरून रहावे , असे तू मला कर .
असा जो भाव तुझ्या कृपेने उत्पन्न झाला आहे, तो तुझ्या कृपेनेच सिद्धीस जावो .
तुका म्हणतो की ह्या परता आता मला दुसरा लाभ नाही .

सर्वस्वाचा भार देवावर घालून अयाचित वृत्तिने राहणे हे सार आहे .
देह देवाच्या स्वाधीन करून योग्य काली त्याची योग्य कर्माकडे योजना करणे हे सार मानावे.
विश्वामधे विश्वपोषक आहे असा निश्चय केला म्हणजे तो सर्व व्यवस्था लावतो.
तुका म्हणतो की अशा प्रकारची स्थिती असणे हेच एक बळ आहे असें समजावे.

अभंगामागची पार्श्वभूमिका :-
नरजन्माचे महत्व काय ह्या बद्दल ह्या अभंगामधे चर्चा आहे, तसेच जन्माचे सार्थक कसे करून घ्यायचे हे सांगणारे दोन अभंग येथे देणे उचित ठरेल असे वाटले म्हणून हे तीन अभंग एकत्र घेतले आहेत. तुकाराम महाराजांच्या ह्या उपदेशातलातला कांही भाग ईतर कांही अभंगांमधे आधी येऊन गेला आहे . समर्थ रामदास स्वामी पण सांगतात की " विवरलेची विवरावे " अर्थात जे महत्वाचे आहे ते परत परत सांगावे. तुकाराम महाराज पण पुन: एकदा आपल्याला हाच विषय ह्या अभंगांद्वारे सांगत आहेत.
जीवन्मुक्त संतांमधे तुकाराम महाराज येतात हे आपण जाणतोच. अशी संतमडळी नेहमीच सहज समाधी अवस्थेमधे असतात. असे असले तरी पण लोक कल्याणार्थ मुद्दाम संत बरेच वेळा आपण सांगतो ते पटावे म्हणून स्वत:चेच उदाहरण देतात. तुकाराम महाराजांच्या अभंगांमधे बहुतेकवेळा असे स्वत:चेच उदाहरण त्यांनी दिलेले आढळते. तसेच ह्या अभंगांमधे पण आहे. असो.
महाराज एक जीवन्मुक्त संतपुरुष होते म्हणुन त्यांच्या शब्दांना स्वानूभवाचे बळ आहे.

अभंगांच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-

अभंग १ ला :-

श्रीभगवद्‌गीते मध्ये अर्जूनाने असा एक प्रश्न भगवंतास विचारला आहे की जर एखाद्या साधकाला मोक्ष मिळाला नाही तर त्याला पुढचा जन्म कोणता येतो ? व भगवंतांनी हेच उत्तर दिले आहे की असा साधक पुढचा जन्म अशा कुळामधे घेतो जेथे त्याची साधना त्याला पुढे नेता येते.
आपण तुकाराम महाराजांच्या पूर्वजांची माहिती पाहीली की आढळते की त्यांच्या सहा सात पिढ्यांमधे परंपरेने विठ्ठ्लाची भक्ती केली जात आहे.

म्हणुनच ह्या अभंगात ( चरण १ ला व चरण ३ रा ) ते सांगताहेत त्यांनी अनेक पूर्वजन्मामधे त्यांनी जी परमार्थ साधना केली त्यामुळे त्यांना आता तीव्रतेने भगवद्‌भक्ती करावीशी वाटत आहे . ते भगवद्‌भजन करताहेत. कारण त्यांना भगवंताच्या दर्शनाची तीव्र आंस लागली आहे.

मनुष्य जन्मा मधे प्राणी कधीनाकधी वासनाधीन होतोच व काम्य कर्मे पण करतो. मग त्या कर्मांचे फळ भोगंण्यासाठी पुन: जन्म पण घ्यावा लागतो. जो मुमुक्षू झालेला असतो त्याला हे कळलेले असते. त्यामुळे अशा मुमुक्षूला पुढचा जन्म कोणता येईल ही काळजी वाटत असते.

तुकाराम महाराज अशा मुमुक्षूच्या भूमिकेत जाऊन येथे असे म्हणताहेत की " अशी काळजी वाटते आहे की जर ह्याजन्मी ही भेट झाली नाही तर पुन: असा नरजन्म मिळेल की नाही.”

अभंगाच्या दुसर्‌या चरणामधे ते स्वत:लाच सांगत आहेत की ही नरजन्माची संधी व्यर्थ जाऊं नये .
म्हणून त्यांनी आता असे ठरविले आहे की आपला जीव बळी देऊन , संसाराची होळी करून टाकायची.

ही संसाराची हॊळी करायची म्हणजे काय ते अभंगाच्या शेवटच्या चरणामधे स्पष्ट केले आहे. महाराज म्हणतात की आता ह्या क्षणापासुन मी विठ्ठलाचे पाय हृदयांत बळकटपणे धरून ठेव्णार आहे.


आपणच स्वत:ला बद्ध समजत असतो. पण खरेतर आपण विषयांना धरलेले असते. असे विषयांना ( घरदार, पती -पत्नी, मु्ले बाळे ऐहिक गोष्टी, कलांचे ज्ञान,   संपत्ती, उत्तम  चविष्ट खाण्याचे पदार्थ, प्रसिद्धी, ईत्यादीना ) व  म्हणूनच  संसारामधे गुंतलेलो असतो. 

उपनिषदांमधे एका पक्षाचे उदाहरण आहे. हा पक्षी स्वत:च  पिंजर्यातल्या  नळीला धरून असतो. जर नळी सोडली तर आपण  पडू अशी भीती त्याला वाटत असते. म्हणून जरी पिंजर्‌याचे दार उघडले तरी तो पिंजर्‌यातच अडकून रहातो म्हणजेच स्वत:च   स्वत:ला   त्याने पिंजर्‌यामधे ठेवलेले असते.

आपली पण स्थिती अशीच असते. जर विवेक विचार  केला तर आपण पण  मुक्त होऊ शकतो.

म्हणूनच  समर्थ   रामदास  स्वामी सांगतात की  परमार्थसाधण्यासाठी कांहीही सोडावे लागत नाही. जो योग्य विवेक विचार करतो तो च सुटतो. असा विवेक विचार करून संसाराचे नाशवंतपण  कळते. मग आपोआपच  संसाराची   आसक्ती कमी होते.

हेच संसाराची होळी करणे .

ही मन:स्थिती जेंव्हा आपण भगवंताचे पाय घट्ट धरतो  अर्थात  सतत  त्याचे स्मरण  ठेवले  की येते. 
पुढचे अभंग हे कसे   करायचे तेच  सांगत आहेत.

तात्पर्य  हेच की संसाराची होळी करणे अर्थात विठ्ठलाचे पाय हृदयात घट्टपणे धरणे हे प्रत्यक्षात आचरणामधे कसे आणायचे त्याचेच स्पष्टीकरण पुढच्या अभंग २ व अभंग ३ मधे महाराजांनी केले आहे.


अभंग २ रा :-

जॊ मुमुक्षु झालेला असतो त्याला हे समजलेले असते की आपल्या वासनाच सर्वप्रथम शुद्ध व्हायला हव्या. कारण वासना हेच जन्म मृत्यू चक्रामधे अडकण्याचे कारण असते.
पण वासनांची शुद्धी करणे हे तेवढे सोपे नसते.
अशा व्यक्तीला ह्या अभंगामधे हाच उपदेश आहे की त्याने सरळ भगवंतालाच शरण जावे व लहान मूल जसे आईला सर्व कांही सांगते तसेच भगवंताकडेच आपले विचार व्यक्त करावेत.
असे आपण जेंव्हां जेंव्हा प्रार्थना करतो तेंव्हा आपण करतच असतो.

प्रार्थनेचे वैशिठ्य हेच असते की प्रार्थना करणार्‌याला भगवंत आपली प्रार्थना नक्की ऐकणारच ही खात्री असते.
अभंगाच्या पहिल्या चरणातच महाराजांनी " हे भगवंता मनामधे कुबुद्धी ( वासनांच्या मागे धावणारी बुद्धी) निर्माणच होऊ देऊ नकोस " ही प्रार्थना केली आहे

जर आपण भगवंताला नाशवंत वस्तूंची मागणी करणारी प्रार्थना केली तर भगवंत ते देईलही पण त्यामुळे आपणच स्वत:हून स्वत:ला जन्मम्रूत्यू चक्रामधे बांधत असतो. अशी प्राथना करणे हा कुबुद्धीचाच एक आविष्कार  असतो हे लक्षांत घ्यायचे आहे.

पण जर आपण शाश्वत भगवंताच्या भेटीची वासना ठेवली तर मग आपण आपोआपच जन्ममृत्यूचक्रातून सुटू शकतो. कारण भगवंताची भेट म्हणजे त्याच्याशी ऐक्य साधणे होय.
प्रभू रामकॄष्ण परमहंस दृष्टांत देताना म्हणतात की " मिठाची बाहुली समुद्राची खोली मोजायला गेली व समुद्रच झाली. तसेच भगवद भेट होणे असते.
ही अशी भगवदभेटीची वासना सतत जागॄत असणे अर्थातच आवश्यक आहे. व म्हणूनच अभंगाच्या पुढच्याच चरणामधे अशी प्रार्थना केली आहे की "हे भगवंता माझ्यामनामधे सतत तुझेच स्मरण असेल असे , माझ्या चित्ताने तुझे पाय धरून रहावे, असे भाव माझ्यामनामधे तू उत्पन्न कर; आणी असा जो भाव तुझ्या कृपेने उत्पन्न झाला आहे, तो तुझ्या कृपेनेच सिद्धीस जावो" .
हे समजले आहे म्हणूनच अभंगाच्या शेवटच्या चरणामधे तुकाराम महाराज म्हणताहेत की " असे घडण्यापरता दुसर कोणताही लाभ आता मला नको आहे. “

अभंग ३ रा :-

असा भाव अंत:करणात उत्पन्न होण्यासाठी आपल्याला भगवंताच्या कर्तृत्वाची पूर्ण जाण असायला हवी. जर आपण स्वत:च्या आयुष्यातल्या घटनांकडे पाहीले व अफाट सृष्टीकडे रात्री जर नजर टाकली तर हे सहजच कळू शकते की " सर्वकर्ता,सर्वज्ञ, सर्वव्यापी असा तो भगवंतच आहे.”

गीतेमधे भगवंत म्हणतात की
" ईश्वर: सर्वभूतानां हॄद्देशे॓ र्जून तिष्ठती।भ्रामयन्‌ सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया॥१८-६१॥
अर्थ: हे अर्जूना, ईश्वर स्रर्व प्राणीमात्रांच्या हृदयात राहून यंत्रावर घातल्याप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या मायेने फिरवत असतो."

ह्या अभंगाच्या सुरवातीलाच म्हणूनच तुकाराम महाराज म्हणताहेत की माणसाने अयाचित वॄत्तीने जगामधे वावरावे. पुढच्या दोन चरणांमधे महाराज आपल्याला हे सांगताहेत की भगवंतावर विश्वास ठेवावा की तोच सर्वकाही आहे. आपला देह सुद्धा त्याच्याच मालकीचा आहे. तोच खरा कर्ता आहे आपण नव्हे

असे झाले की माणूस अयाचित वृत्तीने वागू लागतो.

अयाचित म्हणजे कांहीही न मागता जे मिळेल त्यांत समाधान मानणे, जे घडते ते माझ्या भल्यासाठीच घडत आहे हे मनामधे दॄढ ठेवणे होय. मग जेजे काम आपल्याकडे येते ते त्याचीच ईच्छा आहे हे समजून आपण ते काम त्याची पूजाच आहे ह्या भावनेने करू शकतो. ह्यामुळे आपले हवे -नकोपण संपायला लागते.

अर्थात ह्यासाठी स्वत:ला ह्याची सारखी आठवण करून द्यावीच लागते. प्रार्थना रोज केली की हळू हळू ही आठवण मनामधे ताजी राहाते मनाचा निश्चय होतो की भगवंत माझी सर्व काळजी घेतोच आहे.
अशा भक्ताचा योगक्षेम स्वत: भगवंत वाहतो. हे गीतेमधी दिलेले आश्वासन प्रसिद्धच आहे.

अभंगाच्या शेवटच्या चरणांत तुकाराम महाराज म्हणताहेत की अशा प्रकारची मनाची स्थिती असणे हेच एक बळ ( शक्ती) आहे असें समजावे. बळ ह्यासाठी म्हटले आहे की हे बळच भक्ताला मोक्षस्थिती देते.


अभंगाची शिकवण :- 

शिकवण हीच आहे की ज्याला आपल्या जन्माचे खरे सार्थ करून घ्यायचे आहे त्याने अनन्यभावाने सरळ भगवंतास शरण जावे . ह्यासाठी त्यालाच वेळॊवेळी प्रार्थना करावी की त्यानेच मार्ग दाखवावा.

टीप :- समर्थ रामदासांचे खालील करूणाष्ट्क हे अशी प्रार्थना करण्यास उपयोगी आहे
      ह्या प्रार्थनेमधे सर्व कांही मुद्दे येतात.

अशी प्रार्थना आपण रोज करू शकतो व ह्यासाठी फारतर ५ ते ७ मिनिटांचा अवधी पुरेसा आहे.

समर्थांचे करूणाष्टक "   रघूनायका  मागणें  हें चि आंता " 

उदासीन हे वॄत्ती जीवी धरावी । अती आदरे सर्व सेवा घडावी ।
सदा प्रीती लागो तुझे गूण गाता । रघूनायका मागणे हेंचि आंता ॥ १॥
तुझे रूपडे लोचनी म्यां पहावे । तुझे गूण गाता मनासि रहावे ।
उठॊ आवडी भक्तिपंथेचि जाता । रघूनायका मागणे हेंचि आंता ॥२॥
मनीं वासना भक्ति तुझी करावी । कृपाळूपणें राघवे पूरवावी ।
वसावें मज अंतरी नाम घेतां । रघूनायका मागणे हेंचि आंता ॥३॥
सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ।
उपेक्षू नको गूणवंता अनंता । रघूनायका मागणे हेंचि आंता ॥ ४॥
नको द्रव्यदारा नको येरझारा । नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा ।
सगूणीं मज लावि रें भक्तिपंथा । रघूनायका मागणे हेंचि आंता ॥ ५॥
भवें व्यापलो प्रितीछाया करावी ।कृपासागरें सर्व चिंता हरावी ।
मज संकटी सोडवावे समर्था । रघूनायका मागणे हेंचि आंता ॥ ६॥
मनीं कामना कल्पना तें नसावी । कुबुद्धी कुडी वासना निरसावी ।
नकॊ संशयो तोडी संसारवेथा । रघूनायका मागणे हेंचि आंता ॥ ७ ॥
समर्था पुढे काय मागो कळेना । दुराशा मनीं बैसली हे ढळेना ।
तुटो संशयो नीरसी सर्व चिंता । रघूनायका मागणे हेंचि आंता ॥८ ॥
ब्रिदाकारणे दीन हांती धरावे । म्हणे दास भक्तासि रे उद्धरावे ।
सुटो ब्रीद आम्हांसि सांडून जाता ।रघूनायका मागणे हेंचि आंता ॥९ ॥


















0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home