Tuesday, July 26, 2016

83 rd post :-  पंचभूतांचियें सापडलो संदी । घातलोसें बंदी अहंकारें
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com


   पंचभूतांचियें सापडलो संदी । घातलोसें बंदी अहंकारें॥ १ ॥
आपुला आपण बांधविला गळा । नेंणेचि निराळा असतांही ॥ २ ॥
कासया सत्य मानिला हा संसार ।कां हे केले चार माझें तुझें ॥३ ॥
कां नाहीं गेलो शरण नारायणा । कां नाहीं वासना आंवरिली ॥ ४ ॥
किंचित सुखाचा धरिला अभिलाष । तेणें केला नाश बहु पुढे ॥ ५ ॥
तुका म्हणें आतां देह देऊं बळी । करूनि सांडूं होळी संचिताची ॥ ६ ॥

शब्दार्थ :-
पंचभूतांनी निर्माण केलेल्या तुरुंगात स्वत:च्या अहंकारामुळे मी बंदी झालो आहे.॥१॥
ह्या शरीरापेक्षा निराळे असूनही मी स्वत:च स्वत:च्या गळ्यास फांस लावला आहे ॥ २॥
ह्या संसाराला खरा मानून मी माझी स्थिती अशी कां केली ? ॥ ३॥
वासनांना कां आवरले नाही? नारायणाला कां शरण गेलो नाही ? ॥ ४॥
किंचित सुखाची अभिलाषा धरल्यामुळे माझे फार मोठे नुकसान मी करून घेतले॥५॥
तुका म्हणतो की आता ह्या देहाचा बळी देऊन मी संचिताची होळी करेन॥ ६॥
अभंगाची पार्श्वभूमी :-
आपणा सर्वांनाच हे माहीत आहे की भगवंताने आपल्याला म्हणजे फक्त माणसालाच विचार करण्याची शक्ती व बुद्धीची अत्यंत दुर्मीळ देणगी दिलेली आहे. ही देणगी चौर्‍यांशी लक्ष प्राणी योनितल्या फक्त माणसाकडेच आहे.
प्रत्येक प्राणी आपले सर्व आयुष्य आहार, निद्रा, मैथून व मृत्यूभयातच सर्वसाधारणत: घालवतो. स्वत:च्या शरीर रक्षणासाठीच कार्यरत असतो. माणसांनी केलेले आयुर्विज्ञान व ईतर शास्त्रांचे प्रयत्न ह्या अमरत्वाच्या ध्येयानेच प्रेरित होत असतात.परंतू हे सर्व प्रयत्न अपूरेच असतात हे पण आपण जाणतो.

आपल्या ऋषीमुनींनी फार पूर्वी ह्यावर विचार केला आहे व स्वानुभवावरून हे स्पष्ट सांगितले आहे की माणसाला हे अमरत्वाचे ध्येय साधणे मनुष्यजन्मातच शक्य आहे . ट्यासाठी साम्हणूनच आपल्या शास्त्रांनी प्रयत्नपूर्वक हे शोधून काढले की माणसाला अमरत्व मिळण्यासाठी काय करायला हवे

ह्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की , खर्‌या देवाची भगवंताची भेट हॊणे आवश्यक आहे. ज्याला ही भेट होते तो भगवंताचा अंश होतो व अमर होतो. ( कारण भगवंत हा जन्ममृत्यातीत आहे)
ज्याला अशी ईच्छा होते की आपण भगवंताची भेट घ्यावी व मोक्ष साधावा त्याला शास्त्रांमधे " मुमुक्षू " असे म्हणतात. अशी ईच्छा मनामधे येणे ह्यालाच " मुमुक्षूत्वाचा उदय होणे " म्हणतात.
अशा मुमुक्षूच्या मनामधे कोणते विचार येतात ते हा अभंग सांगतो.

अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-
मनामधे मुमुक्षुत्वाचा उदय झाला की येणारा विचार अभंगाच्या पहिल्याच चार ओळींमधे तुकाराम महाराजांनी मांडला आहे. मुमुक्षुत्वाचे एक मुख्य कारण म्हणजे संतांचे बोल उपदेश ऐकायला मिळणे,
हे आहेच ह्या शिवाय पूर्वसुकृत हवेच. अनेकदा त्रिविधतापांमुळे त्रस्त झाल
ल्यामुळे पण माणुस मुमुक्षू होतो.
एक मुख्य मुद्दा हा पण आहे की जरी जीवात्मा हा खरेतर नेहंईच मुक्त होता व सतत ब्रह्मानंद भोगत होता , पण ह्या दृश्याच्या आसक्तीत गुंतल्यामुळे त्याने शरीर धारणा केली व स्वत:ला मर्यादित शक्ती असणारा समजू लागला. ह्याप्रमाणे जिवात्म्याने स्वत:च स्वत:ला बंदी करून घेतले आहे. द्रूश्याची आसक्ती असल्यामुळे जिवात्म्याला पंचेंद्रियाच्या द्वारे मिळणारे भोग हवेहवेसे वाटतात. भोगांची आठवण चित्तामधे राह्हते. ह्या आठवणींना वासनाबीजे म्हणतात. जर सध्याच्या जन्मामधे वासनापूर्ती झाली नाही की नवे शरीरम्हणजे नवा जन्म घेणे होते व हे चक्र सतत चालू राहते.
जो मुमुक्षू झालेला असतो त्या हे कळलेले असते पण आपण ह्यातून कसे सुटायचे हे मात्र समजत नसते. पण आपण आतापर्यंत वेळ व्यर्थ घालवला ह्याची खंत मुमुक्षूला वाटतेच.
आपण स्वत:ला बाधनात बंदी केले आहे व आता वृद्धत्वाकडे वाटचाल होत आहे ; मग मोक्ष मिळेल कां ही काळजी पण वाटते.
अभंगाच्या पहिल्या दोन ओळींमधे तुकाराम महाराज हाच प्रश्न स्वत:लाच ( मुमुक्षूच्या भूमिकेत जाऊन ) विचारत आहेत की " खरेतर मी स्वतंत्रच व आनंदातच होतो.मग मी स्व:ला असे ह्या शरीर बंधनात कां बांधून घेतले आहे. ?””

असे वाटणे हीच स्वता:ला मुक्त करण्याच्या प्रवासातली पहिली स्थिती होय.

अभंगाच्या पुढच्या ओळींमधे मुमुक्षूला पडलेले दोन प्रश्न तुकाराम महाराजांनी लिहिले आहे . ते प्रश्न म्हणजे
) जरी मला अनुभव येतो आहे की हे सर्व दृश्यजगत नाशवंत आहे ; तरीपण मला असे कां वाटते की जगच अविनाशी आहे?

जग ह्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामधे मुख्यत: स्वत:चे शरीर, बायको/नवरा मुलेबाळे, जवळचे नातेवाईक, मित्र , घर , संपत्ती , स्वत:च्या आवडीनिवडी हवेनकोपण, पंचेद्रियांद्वारे मिळणारे भोग /आनंद ईत्यादी सर्व कांही येते. ह्या सर्वांची आसक्ती हीच जिवाला अनेक जन्म व अर्थातच मृत्यू ह्यामधे फिरवत असते.
) असे असूनही मला ही आसक्ती कां वाटते ?

तुकाराम महाराजांनी लगेच पुढचा प्रश्न पण लिहिला आहे. हा प्रश्न म्हणजे :-
नारायण मला ह्यातून मोकळे करेल हे तर मला माहीत आहे. तरीही हे सर्व समजून उमजून सुद्धा मी नारायणाला कां शरण गेलो नाही?

अर्थात येथे आपण नारायणाला शरण जावे हा भाव / विचार मनामधे उत्पन्न झाला आहे हे दिसते.

म्हणुनच पुढच्या चरणांमधे तुकाराम महाराज म्हणतात की जगातल्या वस्तूंबद्दल आसक्त होऊन मी आयुष्यातला काळ व्यर्थच घालवला आहे. ह्यामुळे माझी फार मोठी हानी झालेली आहे. ( येथे हानी म्हणजे जन्ममृत्यू चक्रामधे अडकणे असा अर्थ घेणे योग्य ठरते कारण जन्म हेच दु:खाचे मूळ आहे), येथे सुखाचा काळ थोडा असतो. बाह्य विषयांकडून मिळनारे सुख क्षणीक असते.

ह्यानंतर अभंगाच्या शेवटच्या चरणामधे वर लिहिलेले विचारमंथन झाल्यामूले आता काय कारवाई करायची हा भाग तुकाराम महाराजांनी स्पष्ट केला आहे. ही कारवाई म्हणजे भगवंताला सर्व संसाराची आसक्ती सोडून देऊन शरंण जाणे ही होय.
म्हणुनच महाराज म्हणताहेत की आता एकच काम करायचे मी ठरविले आहे ते म्हणजे भगवंतास शरण जाणे व संचिताची होळी करायची.( होळी करणे म्हणजेच संचिताचे परिणाम पूर्णपणे संपविणॆ )अशा रीतीने उरते ती फक्त भगवद्‍भेटीची आसक्ती. ही वासना अर्थातच जन्मबंधनातून सोडवते.

अभंगाची शिकवण :-

येथे हेच शिकायला मिळते की आपण आत्मपरीक्षण करून पहायचे की आपल्याल खरेच भगवद्‍ भेटीची आंस लागली आहे कां? जर उत्तर होय असे असले तर मग आपण भगवंतास शरण जाऊन जीवन जगायला सुरवात करायला हवी.


पुढच्या पोस्टमधे शरण जाणे म्हणजे कसे जगणे हे सांगणारे अभंग आहेत ते पाहूया..


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home