Wednesday, June 4, 2014

मराठी ६५ वे  post आयुष्य मोजावया बैसला मापारी।
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.com

आयुष्य मोजावया बैसला मापारी। तूं कां रे वेव्हारी संसाराच्या ॥ १॥
नेईल ऒढॊनी ठाऊकें नसतां । न राहे दुश्चित्ता हरिविण ॥ २ ॥
कठीण हें दु:ख यम जाचतील । कॊण सोडविल तये ठायीं ॥ ३॥
राहतील दुरी सज्जन सोयरिं । आठवीं श्रीहरी लवलाही ॥ ४॥
तुका म्हणें किती करशील लंडाई । होईल भंडाई पुढें थोर ॥ ४॥

अभंगाचा शब्दार्थ :-
अरे, तुझें आयुष्य मोजण्याकरता काळ स्वत:च मापाड्या म्हणजे मोजणारा होऊन बसला आहे, असें असूनही तू ह्या संसाराच्या व्यवहाराच्या मागे काय लागला आहेस ! ॥ १॥
तुला न कळताच तो तुला घेऊन जाईल, म्हणुन तू आता हरिचिंतनावांचून दुश्चित्त राहू नकोस ॥ २॥
तुझ्याकडुन झालेल्या पापकर्माबद्दल यम तुला मोठी शिक्षा करेल, ते दु:ख फार मोठे कठीण असते. त्या दु:खापासून तुला कोण सोडवेल ? ॥ ३॥
तुझे सगेसोयरे मित्र नातेवाईक त्यावेळेला सर्व दूर होतील. याकरता त्वरा कर व हरीचिंतन कर ॥ ४॥
तुका म्हणतो की आता किती दांडगाई करशील?; असे वागशील तर शेवटी तुझेच नुकसान होईल.॥५ ॥

अभंगाच्या मागची भूमिका :-

गीतेच्या ८ व्या अध्यायामधे भगवंताने मृत्यूबद्दल खोल विचार मांडलेले आहेत. नचिकेताने पण छांदोग्य उपनिषदामधे मृत्यूविषयी यमराजाला प्रश्न विचारलेला आहे.

सर्व संतांचे सांगणे हेच आहे की जीव व्यक्त दशेला येतो तो जन्म व अव्यक्तात परत जातो तो मृत्यू. हे त्याचे जाणेयेणे जीवाला जोवर मुक्ती मिळत नाही तोपर्यंत चालू असते. ह्या व निरनिराळ्या जन्मांमधे दु:खच जास्त भोगावे लागते.आनंदाचा काळ फार थोड्या वेळाचा असतो.

फक्त मानव जन्मातच  ह्या दुष्टचक्रामधून सुटण्याकरता प्रयत्न करता येतात.परंतू माणसाला दैनंदिन   जीवनांत अविद्येच्या प्रभावामुळे मृत्यूचे स्मरण राहात नाही.

मृत्यू अटळ आहे , केहा येईल हे कोणालाच कळत नाही. म्हणून वेळ वाया न घालविता योग्य प्रयत्न करणेच महत्वाचे आहे. हेच समजावणारा हा तुकाराम महाराजांचा उपदेशपर अभंग आहे .

अभंगाच्या अर्थाचे थोडक्यांत स्पष्टीकरण:-

तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या व दुसîrÉÉ चरणामधे एक प्रश्न विचारून आपल्याला जागे करीत आहेत. महाराज म्हणताहेत की अरे बाबा, काळ तुझे आयुष्य मोजतोच आहे हे तुला माहीत आहेना?, मग तरीही आपले स्वहित साधण्याचे सोडुन तू संसाराच्या व्यर्थ व्यवहारामधे कां गुंतला आहेस? यम तुला केंव्हाही घेऊन जाईल. म्हणुनच ईश्वराला विसरण्याचा दुश्चित्तपणा करू नकोस.

येथे एखादा म्हणेल की जर मी संसाराकडे लक्ष दिले नाही तर मला अनेक दु:खांना तोंड द्यावे लागेल. मग मी ईश्वराला केंव्हा आठवू? वेळच खरेतर पुरत नाही आहे. आपल्यापैकी सर्वांनाच हा प्रश्न विचारावासा वाटतो व असे वाटते की संत सांगतात ते चूक तर नसेल? आपल्याला सध्यातरी तसे वागणे कठीणच आहे असेच बहुतेक सर्वांना वाटते.

ह्या समस्येवर तोडगा कोणता ह्याचे उत्तर तुकाराम महाराजांनी " ईश्वराला विसरण्याचा दुश्चित्तपणा करू नकोस " असेच दिलेले आहे व ते अभंगाच्या पहिल्या चरणामधेच आलेले आहे.

हे दुश्चित्तपण टाळणे कसे शक्य आहे त्याचे सोपे मार्गदर्शन दासबोधामधे आढळते. (तुकाराम महाराजांचे पण असे अभंग आहेत.) येथे आधी इतर कांही संत काय सांगतात ते पाहणे योग्य ठरेल.
उदाहरणार्थ कांही संताची वचने पाहूया.

) शंकराचार्य :- "भजगोविंदम्‌ "हे स्तोत्रच ह्यासाठी श्रीमद्‍ शंकराचार्यांनी सांगितले आहे. चिन्मय मिशनचे ह्या स्तोत्रावर विवरणपर पुस्तकच आहे. स्तोत्रातला एकच श्लोक वानगीदाखल खाली देतो आहे.
.बालस्थावत्‌ क्रीडसक्त: तरूणस्थावत्‌ तरूणी रक्त: वृद्धस्थावत्‌ चिंतामग्न: परे ब्रह्मणी कोपि न लग्न:

) कबीरांचा ह्याच अर्थाचा दोहा आहे
बचपन बीता खेलखेलमें भरि जवानी सोया ! । देख बुढापा सोचे अब तू क्या पाया क्या खोया?
देर नही है अब भी बंदे ; ले ले उसका नाम रे । बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम ॥

)समर्थ रामदासांनी दासबोधामधे " स्वगुणपरीक्षा निरूपण " नांवाचे चार सलग समास सांगितले आहेत. त्यामधे सर्वसामान्य माणूस आपले जीवन कसे व्यर्थ घालवतो ह्याचे वर्णन आहे.
किंवा रामदासांचे खालील दोन श्लोक पाहता येतील..
मना पाहतां सत्य हे मृत्यूभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती। अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ श्लोक १५ वा॥
मना सांग पां रावणा काय जालें । अकस्मात तें राज्य सर्वे बुडालें॥
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगी । बळें लागला काळ हा पाठिलागी ॥ श्लोक १४ वा॥

सर्वांचे सांगणे हेच की दुश्चित्त पणे जीअन व्यर्थ दवडू नका . हे कसे साधायचे त्यावर
दासबोधामधे नामस्मरण समासामधे समर्थ रामदास स्वामीचे मार्गदर्शन आहे.
ते म्हणतात की
कांहीच न करूनि प्राणी । रामनाम जपे वाणी । तेणें संतुष्ट चक्रपाणी । भक्तांलागी सांभाळी ॥"

कांहीच न करणें म्हणजे " मी कर्ता , मी भोक्ता ह्य़ा भावनेला रजा देणे होय”. गीतेमधे अशा वागण्याला निष्काम कर्मयोग असे म्हणले आहे. आपण जर स्वत:च्याच आयुष्यातल्या घटनांकडे खरा कर्ता कोण होता ह्या दृष्टीने पाहीले तर भगवंतच खरा कर्ता करविता आहे हे सहज लक्षांत येऊ शकते. हेच सतत लक्षांत राहाण्यासाठीच भगवंताचे स्मरण करत रहायचे ही सोपी युक्ती संतांनी सांगितली आहे.
हे असे जगण्याचे विसरणे म्हणजेच दुश्चित्तपणे जगणे होय. असो,

अभंगाच्या तिसîrÉÉ चरणामधे महाराज सांगताहेत की जर तू असे केले नाहीस तर तेच सर्वांत मोठे पाप करणे आहे. या पापाची शिक्षा तुला यम देईलच ह्यात संशयच नाही. ही शिक्षा म्हणजे पुन: जन्म पुन: दु:खे भोगणे . ह्या शिक्षेचा काळ जन्मोजन्म चालत राहणारा असल्याने हीच सर्वांत भयंकर शिक्षा आहे असेच म्हणता येते.

दुश्चित्त पणे वागणे म्हणजे ईश्वराचे स्मरण न ठेवता जीवन जगणे.

अभंगाचा ४ था चरण हेच सांगतो की जेंव्हा मृत्यु येतो तेंव्हा त्यावेळी बायको, मुले वा ईतर कोणीही नातेवाईक, मित्र, सगे सोयरे मदत करू शकत नाहीत. जशी वासना असेल तसाच पुढचा जन्म ती वासना भोगण्यासाठी येतो. जर फक्त ईश्वराच्या भेटीची वासना असेल तर मात्र मग अशा व्यक्तीने शेवटचा क्षण गोड केला असेच म्हणता येते, ह्या ईश्वरभेटिच्या वासने मुळेच मुक्ती मिळू शकते हे सहज समजण्यासारखे आहे.

ह्यानंतर अभंगाच्या ५व्या ( शेवटच्या ) चरणामधे तुकाराम महाराजांनी  दांडगाईने वागणे म्हणजे भगवंतास विसरून वागणे सोडा असे सांगितले आहे व हाच ईशारा दिला आहे की असे वागणे स्व::चाच घात करणारे आहे.

अभंगाची शिकवण :-  

प्रत्येकाने आपण सध्या कसे जगतो आहोत हे नेहमी तपासून स्वत:मधे योग्य ती सुधारणा करावी व नरजन्माचे सार्थक करून घ्यावे हीच ह्या अभंगाची शिकवण आहे.














0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home