Sunday, March 20, 2016

81 B post हेंचि दान दे गा देवा +कुमुदिनि काय जाणें तो परिमळ  

 Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com

अभंग १ ला :-

हेंचि दान दे गा देवा । तुझा विसर न व्हावा ॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥
नलगे मुक्ति धन संपदा । संतसंग देई सदा ॥
तुका म्हणें गर्भवासी । सुखें घालावें आम्हासी ॥ ३ ॥

अभंग २ रा :-
कुमुदिनि काय जाणें तो परिमळ । भ्रमर सकळ भोगितसे ॥ १॥
तैसें तुज नाही ठावें नाहीं तुझें नाम। आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥ २॥
माते तृण बाळा दुधाची तें गोडी । ज्याची न ये जोडी त्यासी कामा ॥ ३॥
तुका म्हणें मुक्ताफळ शिंपीपोटी ।नाही त्याची भेटी भोग तेथें ॥ ४॥

अभंग १ चा शब्दार्थ :-
हे देवा , हेच दान दे की तुझा विसर मला पडणार नाही.॥१॥
मी तुझे गुण प्रेमाने गाईन कारण हीच माझी खरी संपत्ती आहे ॥ २॥
मला मुक्ती , धन संपदा कांहीही नको, फक्त नेहमी संतसंग ( हेच दान) दे ॥ ३।।
ह्यासाठी जरी मला तू पुन: गर्भवास दिलास तरी चालेल. मी हा गर्भवास आनंदाने भोगेन ॥ ४॥

अभंग २ चा शब्दार्थ :-
कुमुदिनीला स्वत:तील परिमळाची जानीव नसते पण भुंगा मात्र त्याचा आनंद भोगत असतो ॥१॥ त्याच प्रमाणे ( हे देवा पांडुरंगा ) तुला तुझे नाव ठावूक नाही. आम्हालाच ते घेण्याचे प्रेमसुख माहीत आहे ॥ २॥ गाय गवत खाते पण तिच्या वासराला दूधाचीच गॊडी माहीत असते, त्याचि काशाबरोबरही तुलना होत नाही ॥ ३॥ तुका म्हणतो की मोती ज्या शिंपल्यात तयार होतो , त्या मोत्याचा भोग घेणे ( दागिने घालून आनंद घेणे ) हे मात्र शिंपलीला ठावूक नसते.

अभंगाची पार्श्वभूमिका :-
समजा भगवंत आपल्यासमोर प्रगट झाले व आपल्याला वर माग म्हणाले तर आपण काय मागू ? ह्या वर विचार करायचा झाला तर प्रथम आपल्याला प्रार्थना व विनंती ह्यामधील फरक पण ध्यानी घेणे आवश्यक आहे.
आपण प्रार्थना नेहमी अशा भावाने करत असतो की आपण जे मागू ते आपल्याला नक्कीच दिले जाईल. आपल्याला ह्या विषयी कांहीएक शंका मनात नसते. शिवाय प्रार्थना करतांना मनामधे पुर्ण श्रद्धा असते की प्रार्थना ऐकली जाईलच.
ह्या उलट जेंव्हा कोणाकडे आपण विनंती करतो तेंव्हा ही विनंती एखादवेळी ऐकली जाणार नाही हे आपल्याला माहीत असते. आपली विनंती ऐकली जाई ही सुद्धा खात्री देता येत नाही.

भक्तासाठी भगवंत हीच माऊली असते . आई नेहमीच आपल्या मुलांच्या भल्याबाबतच विचार करते. आपल्या बाळासाठी काय योग्य व काय अयोग्य ते तिला पूर्णपणे माहीत असते. हे भक्ताला पण ठाऊक असते व तो हे सर्व माहीत असते तरीही बरेच वेळा भगवंताची प्रार्थना करतो.

म्हणुनच वारकरी संप्रदायामधे हे अभंग ( अभंग १ ला हेचि दान देगा देवा चरणाचा ) प्रवचन,,कीर्तनाच्या शेवटी म्हणण्याची प्रथा आहे.

ह्या पार्श्वभूमीवर अभंगाचा अर्थ पाहणे उचित ठरते. " हेचि दान …. “ हा अभंग ही प्रार्थना आहे व दुसरा अभंग ( कुमुदिनी काय जाणे…….) हा अभंग नामस्मरणाची गोडी वर्णन करणारा आहे.

अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-
अभंगाच्या पहिल्याच चरणामधे तुकाराम महाराजांनी भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे. महाराज हेच म्हणताहेत की हे देवा मला तुझा विसर न पडॊ . अभंगाच्या ( ३ रा) चरणात महाराज पुढे ही पण मागणी करताहेत की मला सत्संग घडावा.
मला धन ,संपती फार काय मोक्ष सुद्धा नकॊ हे ते भगवंताला प्रार्थना करताना स्पष्ट केले आहे.

आपण महाराजांचे कांही अभंग मागे पाहिलेच आहेत. त्यांवरून हा मुद्दापण स्पष्ट झाला आहे की जेंव्हा एखाद्याच्या हातून भगवंताचे नामस्मरण करणे घ्डते व संत ग्रंथांमधे सांगितल्यानुसार आच्ररण ठेवले तर असा भक्त सहजत: सतत भगवंताच्या संगामधेच असतो.

हेच महत्वाचे असल्यामुळे तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटले आहे की त्यांना भगवंताचे गुण गाण्याची , त्याचे नामस्मरण करण्याची , ( व अर्थात सर्वांचे कल्याण करण्यासाठी ) आवड प्रेम लागॊ.

ह्याठिकाणी आता अभंग २ रा शब्दार्थ पाहिला तरी पुरेसे आहे.ह्या अभंगात तुकाराम महाराजांनी भगवद्‌स्मरण करण्यात , भगवंताचे गुण गाणारी भजने गाण्यात जो आनंदाचा अनुभव मिळतो त्याची गोडी कशी असते ते समजावे म्हणून कमळ-भुंगा, गाय-वासरू, मोती-शिंपला ही उदाहरणे ( दॄष्टांत ) दिले आहेत.

ह्या अभंगात तुकाराम महाराज म्हणताहेत की :-
) कंमळपुष्पाला स्वत:मधील सुगंधाची जाणीव नसते , पण भुंग्याला असते व म्हणुन भुंगा तो आनंदाचा भोग भोगत असतो.
) गाय गवत खाते व दूध देते . तिला स्वत:च्या दुधाची गोडी कशी असते ते कोठे ठावूक असते !. ती गोडी दूध पिणारे वासरूच जाणते. त्याच्या ड्रूष्टीने ह्या दुधाची सर कशालाच नसते,
) ज्या शिंपल्यामधे मोती तयार होतो त्या शिंपल्याला मोत्याचे मोल व मोत्याचे दागिने घालण्याच्या मुळे मिळतो त्या आनंदाची कल्पनाच नसते.

त्याप्रमाणेच हे भगवंता , तुला तुझे नाम घेण्याची काय गोडी आहे ते तुम्हाला ठावूक नाही. तो आनंद काय ह्याचा अनुभव आम्ही भक्तच भोगू शकतो. असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.

बरोबरच आहे. भगवंत सर्वत्र , सर्वव्यापी असल्याने कोण कोणाचा भोग घेणार! भोग गेण्यासाठी द्वैत लागते. देव व भक्त वेगळे असावे लागतात व नंतरच भक्ताला देवाचे नाम घेण्याचे सुख काय आहे तो अनुभव येऊ शकतो.आपण द्वैतामधेच आहोत व म्हणूनच आपल्याला पण हा आनंदाचा अनुभव मिळू शकतो.असो.

अभंगाचा चौथ्या चरणात तुकाराम महाराज म्हणताहेत की हे भगवंता तुझ्या नामसंकीर्तनाची गोडी एवढी अद्वितीय आहे की ती पुन:पुन्हा अनुभवता यावी त्यासाठी तुम्ही मला पुन: माणसाचा जन्म द्यावा.


अभंगाची शिकवण :-
अभंगाची शिकवण हीच आहे की आपल्याला भगवंताकडे काय मागावे हे लक्षांत यावे.

स्पष्टच आहे की भगवंत आपल्याला धन, संपत्ती, मान स्नमान ईत्यादी सर्व कांही देऊ शकतो. पण हे सर्व मागणे म्हणजे समर्थ रामदास म्हणतात तसे " कामधेनू कडे ताक मागण्य़ासारखे आहे"ह्या नरजन्माचे सार्थक व्हावे असे ज्याला मनापासून पटले असेल तो भगवंताकडे फक्त तुझे प्रेम,भक्ती व ज्यान दे हेच मागेल.
आपली मनोभूमिका अशी आहे कां? हे तपासून पाहण्याची संधीच ह्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home