Thursday, February 18, 2016

80A MarathI post  संतसंगतीचे महत्व काय हे सांगणारे २ अभंग

Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com


संतांचे कार्य व संतसंगतीचे महत्व काय ? हे सांगणारे २ अभंग
अभंग १ ला :-
रवी दीप हिरा दाविती देखणें । अदृश्य दर्शनें संतांचेनि ॥
त्यांचा महिमा काय वर्णूं मी पामर । न कळें तो साचार ब्रह्मादिकां ॥
तापली चंदन निववितो कुडी । त्रिगुण तो काढी संतसंग ॥
मायबापें पिंड पाळियला माया। जन्ममरण जाया संत संग ॥
संतांचे वचन वारी जन्मदु:ख । मिष्टान्न तें भूक निवारण ॥
तुका म्हणें जवळीं न पाचारिता जावें । संतचरणी भावें रिघावया ॥१ ॥

शब्दार्थ :- सूर्य ,दिवा, चमकणारा हिर्याचा प्रकाशामधे दृश्य दिसते. पण संतांच्या दर्शनाने जे अदृश्य आहे ते सुद्धा दिसते.॥ त्यांचा महिमा ब्रह्मादिकांना कळला नाहि व मग मी मी पामर तो कसा वर्णन करू शकेन ॥ चंदनाचा लेप केला तर ताप उतरतो , पण्स संतसंग त्रिगुणातीत करतो. ॥ आईवडील मायेने शरीराचे पोषण करतात. संत संगाने जन्ममरणातीत होणे घडते.॥ गोड जेवण भूक भगवते, पण ससंतवचनन्नल्ने जन्मदू:खसतून सुटका होते. ॥ तुका म्हणतो की संतांनी जरी जवळ बोलावले नसेल तरी ही संतचरणी भावाने शरण जावे ॥१॥
अभंग २ रा :-
पाप ताप दैन्य जाय उठाउठी । जाहलिया भेटी हरिदासाची ॥
ऐसें बळ नाही आणिकांचे अंगी । तप तीर्थ जगीं दान व्रत ॥
चरणींचे रज रज वंदे शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्याचे माथां ॥
भव तरावया उत्तम हें नाव । भिजों नेदी पाव हात कांही ॥
तुका म्हणें मन झालें समाधान । देखिल्यां चरण वैष्णवांचे ॥ २ ॥

शब्दार्थ :- जर हरीदासाची भेट झाली तर सर्व पाप ताप व दैन्याचे हरण होते. अशी शक्ती जगातल्या ईतर कोणत्याही साधनामधे जसे तप करणे, तीर्थयात्रा करणे, दान करणे किंवा व्रताचरण करणे ईत्यादिंमधे नाही. ॥ स्वत: श्री शंकर सुद्धा हरिदासाच्या चरणधूळिला वंदनीय मानतात व कीर्तन करताना माथ्यावर घेतात. आपले हात पाय न भिजू देता भवसागर पार करणारी हरिदास हिच जणु एक नाव आहे. ॥तुका म्हणतो की अशा वैष्णवांचा चरणांचे दर्शन झाले व मनाला समाधान मिळाले ॥ २ ॥

अभंगाच्या अर्थस्पष्टिकरणा साठी असलेली पार्श्वभूमी :-

तुकाराम महाराजांच्या अभंगांचे एक वैशिष्ठ्य हे आहे की अभंगातल्या कांही चरणाचा अर्थ सरळ सोपा असतो. तर कांही चरण असे असतात की त्यांचा गूढार्थ आपल्याला भगवद्‍भेटिस जाण्याचा मार्ग सोपा करून देतो. ह्या अभंगांची रचना पण अशीच आहे.


संतांची लक्षणे कोणती ते वर्णन करणारे अभंग आपण मागे पाहिले पाहिली आहेतच.
संत म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष होत हे आपण जाणतोच. अशी संतमंडळी फक्त भवसागरातल्या तापांमुळे होरपळत असलेल्या लोकांचे कल्याण व्हावे म्हणूनच कार्यरत असतात.
ब्रह्मज्ञान , आत्मज्ञान हे एकमेव असे ज्ञान आहे की जे मिळाले की नवे व आणखी कांही मिळवायचेच शिल्लक रहात नाही. शा व्यक्तीला खरेतर सर्व विश्वाचे स्वामित्व मिळालेले असते. आत्मज्ञान होणॆ ह्यालाच्र मोक्ष मिळणे असेही म्हणतात.

फक्त मनुष्य जन्मामधेच हे ज्ञान मिळणे शक्य असते व म्हणूनच अनेक लोक ह्यासाठीच प्रयत्न करत असतात. ह्या प्रयत्नांचे स्वरूप जप ,तप, पूजा , कीर्तन, अर्चन, तीर्थयात्रा, व्रते , दान ईत्यादि कर्मे करणे असे असते. अर्थातच असे प्रयत्न खूप काळ व निष्काम भावनेने करणे जमले तरच फळ मिळण्याची शक्यता असते. थोडक्यात म्हणायचे झाले तर हे असे वागणे सर्वसाधारण माणसासा कठीणच असते.

पण मोक्षाची वाट दाखवणारा एक आणखी सोपा उपाय संतांनी सांगितला आहे. तो म्हणजे सत्संगतीत राहणे.
अशा सत्संगतीत जर आपण राहिलो तर काय फायदे होतात ते तुकाराम महाराजांनी ज्या दोन अभंगांमधे आपल्याला सांगितले आहेत तेच आता आपण येथे पाहणार आहोत.

अभंगांच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-
अभंग १ ला ( रवी दीप हिरा दाविती देखणें) चरण असलेला ) :-
अभंगाच्या पहिल्याच चरणामधे तुकाराम महाराजांनी दृश्य व अव्यक्त भगवंत ह्यांच्या मधला फरक स्पष्ट केला आहे .
दृश्यातल्या वस्तूचे दर्शन ( वस्तू दिसणे ही क्रिया ) सहज घडते. त्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाश, दिवा किंवा दिव्याचा प्रकाश पडून चमचमणारा पुरेसे आहेत.

भगवंत म्हणजेच ह्या सर्व विश्वाचा स्वामी (जो सर्वज्ञ , सर्वशक्तीमान, सर्वव्यापी आहे व अव्यक्त राहून सर्व विश्वाचा कारभार तो चालवत असतो) त्याचे दर्शन होण्यासाठी संतसंगतीचा प्रकाशच म्हणजेच संतसंगत हीच आवश्यक असते (कारण संतांनाच भगवंत कळलेला असतो, ) हा प्रकाश म्हणजेच ज्ञानदृष्टीचा लाभ होणे होय. जो संताच्या उपदेशानुसार आपले वागणे ठेवतो त्याला योग्यवेळी हॊ ज्ञानदृष्टी संतकृपेमुळे ( सद्‍गुरुकॄपा ) मिळते. ह्यासाठीच संतसंगतीत रहायला हवे.

संताची प्रत्यक्ष भेट होणे तसे दुर्मीळच पण संतांचे ग्रंथ हे त्यांचेच रूप होय व आपण नक्कीच अशा ग्रंथाची संगत ठेवू शकतो. असो.

संत संगतीचे महत्व खालील तीन उदाहरणे दृष्टांत देऊन महाराजांनी स्पष्ट केले आहे.
दृष्टांत ) आईवडील आपल्याला ह्या जगामधे पोसतात , वाढवतात सांभाळतात. दु:खांपासून संरक्षण करतात . पण ते आपल्या मुलाबाळाचे सर्व प्रकारच्या दु:खापासून नेहमीच रक्षण करू शकत नाहीत. आईवडीलाची माया खरेतर जन्मदु:खातच अडकवणारी असते कारण आपल्या मुलांनी भरपूर संपत्ती मिळवावी, लग्न करून सुखाचा संसार करावा ह्यासाठीच ते नेहमी प्रयनशील असतात. सर्व शिक्षणपण ह्याच उद्देशाने घेतले जाते. व्यवहार दृष्ट्या ह्यात कांहिच चूक नाही. पण मग अर्थातच मनुष्य जन्माचे अनमोल संधी व्यर्थ जाते व जीव जन्ममृत्यूचक्रामधे भटकत राहतो. अशा जीवाला खरे शाश्वत समाधान कधीच मिळत नाही.
ह्याउलट परिणाम संताच्या बाबतीत होते.
संतमाऊली रूपाने ( आईच्या सारखेच) भगवंत आपल्यामधे आलेले असतात / येतात म्हणुनच व त्यांची संगत सहवास माणसाला जन्ममृत्यूचक्रामधून नेहमीसाठी सोडवते व खरे समाधान मिळवून देते.

दृष्टांत ) चंदनाचा लेप आपल्याला ज्वरातून आपल्याला बरे करतो. पण संतसंग आपल्याला त्रिगुणातीत करतो व भवतापाच्या ज्वरातून बाहेर काढतो. आधीच्या अभंगाच्यावरच्या विवरणामधे हा मुद्दा येऊन गेला आहे की वासना हे जन्ममृत्यूचक्रात अडकण्याचे व त्यामुळे सतत दु:खभोगांचे मुख्य कारण आहे.

प्रत्येक माणुस व प्राणीमात्र हे त्रिगुणांच्या आधिपत्याखाली वावरत असतात. तमोगुणामुळे ईतरांना दु:ख देणारी कर्मे घडतात. रजॊगुणामुळे विषयभोगांच्या वासना तृप्तीसाठी कर्म केले जाते . वासना तृप्ती झाली तरी त्यांचा अंश बीजरूपाने उरतो व हा अंश पुढच्या जन्माची तयारी करतो. सत्वगुण नक्कीच भगवद्‍भेटीस उपयोगी आहे. पण त्यामुळे सुद्धा मनामधे सात्विक कर्माचा अहंकार उत्पन्न होऊन अधोगती होऊ शकते. भगवंताची भेट होण्यासाठी अहंकार संपूर्ण लयाला जायला हवा ते होत नाही . म्हणुनच श्रीमद्‌भगवद्‌गीतेमधे पण भगवताने " अर्जूना तू त्रिगुणातीत हो " अस उपदेश केला आहे.


त्रिगुणातीत होण्यासाठी सर्व संतांनी थोडक्यात खालील उपदेह्स केलेला आहे.

) भगवंत सर्वांभूती आहे. म्हणून सर्व प्राणीमात्रांशी प्रेमानेच व्यवहार करावा. त्यांना सुख होईल ह्यासाठीच प्रयत्नशील असावे. अशी माणसे आजही आपल्याला आढळतात.
उदाहरण द्यायचे झाले तर ) ज्याने पोलियॊची लस शोधली तो महान शास्त्रज्ञ जोनास साल्क. त्याने ह्या लशीचे पेटंत घेतले नाही तर सर्वांसाठी आपला शोध खुला केला. ) डा. बाबा आमटे ज्यांनी आदिवासी जनांच्या साठी आपले जीवन वाहून घेतले आहे. ) श्री.रामकृष्ण मिशनचे अनेक संन्यासी.

) जे आहे त्याचा अधिपती , स्वामी भगवंत आहे हे समजून घ्यावे व नाशवंत वस्तूंची आसक्ती सोडावी.
) कर्ता करविता पण भगवंतच आहे. तोच आपल्याला कार्य करण्याची बुद्धी देतो. म्हणुन जे काम आपल्याला मिळते ते त्याची पूजा म्हणूनच करावे. त्याचे जे कांहि फळ मिळेल ते आनंदाने स्विकारावे व समाधानी रहावे.
) सतत त्याचे स्मरण ठेवावे.( ह्यासाठी नामस्मरणाचे सोपे साधन संतांनी आपल्याला दिले आहे.
ह्या रीतिने जर आपण व्यवहारात वागलो तर आपोआपच त्रिगुणातीत होऊ शकतो हा मुद्दा येथे स्पष्ट केलेला आहे.
दृष्टांत ) उत्तम सुग्रास गोड जेवणाने भूक भागून माणूस तृप्त होतो. पण कांहिवेळाने परत भूक लागते व झालेले समाधान नष्ट होते. ह्याउलट संतवचनाप्रमाणे वागले की असे समाधान मिळते की माणूस कायमचा समाधानी तृप्त होतो.

अभंगाच्या शेवटी म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात की मी हे जे वर सांगितले आहे ते समजून घ्यावे व संतांनी जरी जवळ बोलावले नसले तरीपण त्यांना शरण जावे व नरदेहाचे सार्थ करून घ्यावे.

अभंग २ चे स्पष्टीकरण (पाप ताप दैन्य जाय उठाउठी) चरणापासून सुरू झालेला :-
संताना शरण गेल्यावर होणारे फायदे पुढच्या अभंगात जरा वेगळ्या पद्ध्तीने तुकाराम महाराजांनी सांगितले आहे.

अभंगाच्या पहिल्याच चरणामधे महाराज म्हणतात की जर हरीदासाची भेट झाली तर सर्व पाप ताप व दैन्याचे हरण होते. येथे हरिदास हा शब्द संत ह्या शब्दाला पर्यायी म्हणुन तुकाराम महाराजांनी योजलेला आहे. पापाची व्याख्या " भगवंताचे अर्थात स्वस्वरूपाचे विस्मरण होऊन केलेले वागणे “ अशी समर्थ रामदासांनी " केली आहे. असे विस्मरण झाल्यामुळेच माणूस विषयभोगांच्या मागे धावत असतो. भोग मिळाल्याने तात्पुरते समाधान मिळते पण तेच परत परत घ्यावेसे वाटते व शेवटी शरीराला रोग दु:खच मिळते. ह्याशिवाय वासनाबीजांच्या निर्मितीमुळे पुढच्या जन्माची तयारी होते. म्हणून विस्मरण हे पाप आहे.
पण जेंव्हा संताची भेट होते किंवा संत साहित्याचे वाचन,मनन घडते तेंव्हा मोक्षाचा मार्ग स्पष्ट होतो व सर्व दु:खांचे निवारण होते.

पुढच्या चरणामधे महाराज म्हणताहेत की ही दु:खनिवारण करण्याची शक्ती जगातल्या ईतर कोणत्याही साधनामधे जसे तप करणे, तीर्थयात्रा करणे, दान करणे किंवा व्रताचरण करणे ईत्यादिंमधे नाही. कारण स्पष्टच आहे . ह्या कार्यामुळे पुण्यपदरी पडेलही, अंगी सात्विकता पण येईल. पण ह्यामुळे मोक्षाची शक्यता फार कमी असते.

श्रीमद्‍ शंकराचार्य भजगोविंदम‍ स्तोत्राच्या शेवटि हेच सांगतात की
कुरुते गंगासागर गमनं, व्रतपरिपालन अथवा दानं ,
ज्ञान विहीनं कर्म अनेन ,मुक्तिर्नभवती जन्मशतेन " .
हाच मुद्दा अभंगात तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे.

संतसंगत किती महत्वाची आहे हे सांगण्यासाठी दुसरा दॄष्टांत प्रत्यक्ष भगवान शंकरांचा महाराजांनी अभंगात लिहिलेला आहे. भगवान शंकर हे सतत "रामनाम स्मरण "करीत असतात. येथे राम म्हणजे परब्रह्म व शंकर भगवानांचे रामनामस्मरण म्हणजेच स्वस्वरूपाचे स्मरण असणे होय.
म्हणुनच मला असे वाटते की शंकर सुद्धा हरिदासाच्या ( म्हणजेच परब्रह्मरूप संताच्या ) चरण धूलीला मस्तकावर घेतात, अशा हरिदासांचे कीर्तन करतात असे तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटले आहे.
अभंगाचे शेवटचे चरण हेच म्हणतात की अशा हरीदासांची संगत तसेच त्यांचे चरण दर्शन ( त्यांच्या पायी केलेली संपूर्ण शरणागती ) हीच जणू एक नाव आहे. ह्या नावेमुळे आपले हातपाय न भिजता ( संसारचे कष्ट सुसह्य होतात) भवसागर पार होतो. जन्मदु::खाचे निवारण होते ; अर्थात शाश्वत समाधानाचा धनी होणे घडते.

अभंगाची शिकवण :-
शिकवण हीच आहे की संत पुरुषांना शोधावे अथवा त्यांचा उपदेश समजून घ्यावा व त्याप्रमाणे वागणूक ठेवून आपल्याला मिळालेल्या मानव जन्माचे सार्थक करून घ्यावे.






0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home