Sunday, August 22, 2021

अभंग : अवघा तो शकुन । वर चिंतन
Post on 22/08/2021 
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com 

For English Readers a separate post has been added.

              संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगावर निरूपण

अभंग :-

अवघा तो शकुन । हृदयी देवाचे चिंतन ।

येथे नसतो वियोग । लाभा उणे काय मग ।

छंद हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा |

तुका म्हणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥

शब्दार्थ :- हृदयी देवाचे चिंतन करणे याखेरीज दुसरा कोणताच शकून मानू नये. येथे देव व भक्तामधे  द्वैत  नसते वेगळेपण नसते. अशा हरिभक्ताची वाणी नेहमीच शुभ असते. ज्याला हरिनामाचा छंद लागला आहे अशा हरिभक्तासाठी सर्व काळ सर्व दिशा कल्याणकारकच असतात.

अभंगाचा भावार्थ :- ह्या अभंगाच्या भावार्थाचे दोन भाग आहेत.

१)      पहिल्या भावार्थाप्रमाणे येथे ह्या अभंगामधे तुकाराम महाराजांनी हरीभक्ताचे दर्शन झाले तर कोणता फायदा होतो हे सांगितले आहे. सतसंगतीचे महत्वच येथे सांगितलेले आहे.

२)      तसेच दुसरा भावार्थ मुमुक्षू साधकासाठी उपयोगी आहे.

भावार्थाचा भाग १ ला :- जेंव्हा एखादा भक्त हरीनामस्मरणात दंग होतो तेंव्हा त्याच्या मनामधे हरीचे नाम मनामधे येते व त्यावेळी  त्याच्या  डोळ्यांसमोर भगवंताची मूर्ती उभी राहते व मन भगवंताशी क्षणभर तरी ऐक्य पावते. अशा प्रमाणे नाम घेतल्याक्षणीच भक्त व भगवंत यांच्या मधे ऐक्य झालेले असते.

अशा भक्ताकडून जेंव्हा नामस्मरण सतत होत असते अर्थात तेंव्हा त्यांच्या मनामध्ये भगवंताचेच चिंतन सुरू असते. मग तो शरीराने काहीही कार्य करत असला तरी हे चिंतन मनामधे सतत होत असल्यामुळे भगवंत व भक्ताचे ऐक्य कधीच भंग होत नाही म्हणुनच अशा भक्ताचे दर्शन हाच सर्वात मोठा शुभशकून होय, असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.

नारदांना भगवंत सांगतात की “ नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ । मद्‌भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥   म्हणजेच जेथे माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी मला स्मरतात तेथे मी उभा असतो; असे भगवंतांनी नारदमुनींना सांगितले आहे.

म्हणूनच आपल्याकडे जेथे हरिभजन, कीर्तन चालू असते त्याठिकाणी भगवंताचा वास असतो हा समज आहे व तो योग्यच आहे. जेंव्हा आपण सत्संगात असतो तेंव्हा आपण भगवंताच्या सहवासातच असतो. म्हणूनच सत्संग हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. जे कोणी अशा सत्संगात असतात त्यांचे मन त्यामुळे शुद्ध  होते व अशा स्वच्छ मनाच्या आरशातच भगवंत प्रगट होतो. ह्याप्रमाणे ह्या अभंगाचा अर्थ आपण घेऊ शकतो.

तुकाराम महाराज म्हणूनच अभंगात म्हणतात की अशा सत्संगाची वेळ व स्थान कोणतेही असले तरी असा सत्संग मिळणे हा शुभशकूनच आहे. अर्थातच अशा सत्संगासाठी  कोणत्याही दिवसामधील  कोणतीही वेळ योग्यच असते. आपल्याकडे अनेक लोक राहूकाळ हा चांगले काम सुरू करण्यासाठी योग्य व शुभ मानत नाहीत पण जर अशा राहूकाळात सुद्धा जर एखाद्या ठिकाणी सत्संग  चालू असेल व आपल्याला तेथे जाण्याची ईच्छा मनात आलेली असेल तर ती वेळ हा तो शुभकाळच आहे असे  महाराजांनी म्हटले आहे.

अशा सत्संगाचे महत्व सांगताना भजगोविंदम्‌ स्तोत्रामधे श्रीमद्‍ शंकराचार्य म्हणतात

सत्संगत्वे नि:संगत्वं , नि:संगत्वे निर्मोहत्वम्‌ । निर्मोहत्वे निश्चलत्वं, निश्चल्तत्वे जीव्न मुक्ति:॥

ह्या वचनाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे.

अर्थ :- संतांच्या सहवासात राहिल्याने भक्त शेवटी संगविहीन होतो. त्याचे सर्व भ्रम , व्यर्थ विचार, चुकीच्या समजुती , दृश्यातल्या वस्तुंविषयी च्या अभिलाषा, भोगांच्य़ा इच्छा ह्या सर्वांपासून तो वेगळा होतो. त्याच्यावर ह्या सर्वाचा परिणाम होत नाही. मन  स्वतंत्र वासनारहित होते. ते भगवंतावर स्थिर होते. निश्चल तत्वावर स्थिर होते.व ह्यामुळे भक्ताला देहामधे असतानाच मुक्ती मिळते.

जे शंकराचार्यांनी सांगितले तेच तुकाराम महाराजांनी ह्या अभंगात वेगळ्या शब्दांमधे सांगून  जीवन्मुक्तीसाठी नामस्मरणाचा सोपा मार्ग पण सांगितलेला आहे. कारण नामस्मरणाने आपण सतत भगवंताच्या सत्संगातच राहतो.

येथे शिकवण मिळते की “ सत्संगाला जरूर जाणे हे केंव्हाही योग्य असते  व सत्संगास जाणे माणसाने टाळू नये.”

भावार्थ २ रा :- अनेक संतांनी नामस्मरण करण्याचा उपदेश केलेला आहे. हा अभंग सुद्धा जो मुमुक्षू साधक असेल त्याला नामस्मरण करण्याचाच उपदेश करणारा आहे.

ह्या अभंगामधे संत तुकाराम महाराजांनी नामस्मरण कसे नेहमी सुरू ठेवावे हेच जणूकांही सांगितलेले आहे. तुकाराम महाराज अभंगामधे म्हणताहेत की :-

जेंव्हा आपण   भगवंताने आपल्याला सतत कसे सांभाळले आहे? “  ह्या मुद्द्यावर्  मनन, चिंतन केले तर लक्षांत येते की आपल्याला अगदी गर्भात् होतो तेंव्हापासून भगवंतानेच सतत आईच्या मायेने व वडिलांच्या  कठोर मुखवट्यामागे असणाऱ्या प्रेमाने  आपल्याला सतत सांभाळले आहे. जी कांही संकटे आली ती आपल्याला कांही शिकवून गेली , तसेच आपले  प्रारब्धाचे भोग संपविण्या साठीच आलेली होती.  ह्या चिंतनामुळे मनामधे   भगवंताची भेट व्हावी हा ध्यास निर्माण होतो. मग  त्यासाठी संतांनी सांगितलेला नामस्मरणाचा उपाय आपण अंगिकारतो. देहाचे क्षणभंगुरत्व कळते व प्रत्येक क्षण नामस्मरण करणे हाच उपाय मनाला पटतो अर्थात  शेवटी  नामस्मरण करणे हाच मनाचा छंद होतो. आपण भगवद्‍भक्ती करू लागतो.

ह्याचाच परिणाम म्हणजे अशा भक्ताच्या हृदयात सतत भगवंताचेच  चिंतन होऊ लागते. असा भकत, वाणीने नामस्मरण करत असतानाच , आपली सर्व कामॆ भगवंताचीच पूजा ह्या भावनेने करू लागतो. त्याची धारणा बनते की भगवंतच आपल्याकडूनच सर्वकांही कार्य करून घेत आहे .

भक्तीच्या ह्या अवस्थेलाच “ तीव्र मुमुक्षुत्वाची अवस्था “  म्हणतात.

नामस्मरणाबद्दल् आपली शास्त्रे असे सांगतात की  कोणत्याही वस्तूचे नांव मनामधे आठवले  की त्यावस्तूची प्रतिमा मनामधे त्याच क्षणी निर्माण होते. मन त्या प्रतिमेशी एकरूप होते.

म्हणूनच् जर सतत भगवंताचे नाम घेतले गेले तेवढा वेळ मन भगवंतमयच होते. भगवंत हा आनंदरूप, प्रेमरूप, आहे. आपले मनपण तसेच बनते. आपल्या  मनाची शुद्धी होते. मनाच्या ह्या स्वच्छ आरशातच  भगवंत येतो.

 अशी स्थिती असलेल्या भक्ता द्वारे जे कांही बोलणे होते ते खरेतर त्याच्या कडून भगवंतच बोलवून घेत   असतो.  ह्यालाच तुकाराम महाराजांनी अभंगामधे “  शुद्ध वाचा होणे “ असे  म्हटले आहे. तसेच जो भक्त तीव्र मुमुक्षूत्वाच्या अवस्थेला पोहोचतो त्याला भगवंताशिवाय दुसरे कांहीही सुचत नसते. ह्यालाच निदिध्यास लागणे असेपण म्हणतात. असा निदिध्यास लागला की भक्ताकडून  चिकाटीने व मुख्यत: भगवद्‌प्रेमाने नामस्मरण घडते. ह्या सतत केलेल्या नामस्मरणामुळेच; आधी वर्णन केल्याप्रमाणे भक्त व भगवंत यांच्यामधे ऐक्य घडते.

 तुकाराम महाराजांनी म्हणूनच अभंगात म्हटले आहे की  “ भगवंताचा वियोग होत नाही.”  अशा भक्ताची वृत्ती  दास्यभावाची होते. त्याची भक्ती दास्यभक्तीमधे बदलते व तो हरीदास म्हणजेच भगवंताचा दास होतो. अर्थात ह्यात त्याला आनंदच मिळत असतो.

आपल्याकडे एखादे  कार्य सुरू करण्याच्या आधी जर कांही विशिष्ठ घटना घडल्या तर त्यांना शुभशकून म्हणतात. असे शकून झाले तर कार्य नक्की सिद्ध होते. ह्या कल्पनेचाच दृष्टांत अभंगात घेऊन संत तुकाराम म्हणताहेत  की अशा भक्ताचे दर्शन होणे हाच मोठा शकुन असतो. मग असा भक्त म्हणजेच हरीदास , कोणत्याही दिशेला दिसला तरी त्याच्यासाठी सर्वकाळ सर्व दिशा कल्याणकारकच असतात.

मुमुक्षूंसाठी अभंगाची शिकवण हीच आहे की नामस्मरणाच्या सहाय्यने भगवंताला दृढ धरून ठेवावे व जीवीताचे सार्थक करून घ्यावे.

                                                           


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home