Tuesday, September 24, 2019

 स्वर्गातून पाठवलेल्यातील ४था अभंग :-24/09/2019date 
 Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com



Date :- 24th Sept 2019
स्वर्गातून पाठवलेल्यातील ४था अभंग :-
जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन।भगवंत जाण त्याचेजवळी ॥ १ ॥
त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥ २॥
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खूण जाणती हे ॥ ३॥
जाणती जे खूण स्वात्मअनुभवी । तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥ ४ ॥

शब्दार्थ :-
जशी गंगा नदी वाहत असते तसे त्याचे मन असते. त्याच्याजवळ भगवंत आहे हे ह्या खुणेवरून समजावे. ॥१ ॥ देव त्याच्यापाशी त्याच्या भक्तीभावामुळे उभाच आहे व अशा भक्ताला स्वानंदाचा गाभा असा भगवंतच प्रत्यक्ष दिसतो॥२ ॥ त्याला भगवंताचे अंगुष्ठमात्र असणारे रूप दिसते , ज्याला हा अनुभव आहे त्यालाच ही खूण समजेल ॥३॥ ही खूण ज्यांना आत्मस्वरूपाचा अनुभव मिळाला आहे तेच समजतात. तुका म्हणतो की ही पदवी म्हणजे स्थिती ज्याची ( पात्रता आहे) त्यालाच लाभते. ॥४ ॥

अभंगाचा सखोल अर्थ स्पष्ट होण्यासाठी लागणारी माहिती.

) महाराजांनी आपल्याला पहिल्या अभंगात जन्माची कारणे तसेच दु:ख भोगावे कां लागते हे सांगून ह्यातून सुटके साठी परमार्थ साधन करावे हे सांगितले आहे.

) त्यानंतर चित्तशुद्धीचे महत्व सांगणारा अभग दुसरा आहे. त्यामधे ब्रह्मज्ञानी सदगुरुंना शरण जावे हा उपदेश महाराजाम्नी केला आहे.
) आता ह्या तिसऱ्या अभगामधे; तुकाराम महाराज आपल्याला तीन मुद्दे सांगताहेत ) अशा चित्तशुद्धीमुळे काय होते?
) चित्तशुद्धी व्हावी म्हणून आपण काय प्रयत्न करावे? किती वेळ करावे?
) भवंताशी ऐक्य कोणाला लाभते. अर्थात मुक्ती कोणाला मिळते?

सर्वप्रथम मुक्ती मिळते म्हणजे काय ते थोडक्यात पाहून आपण अभंगाकडे वळणे उचित होईल.

भक्तीचे सर्वोत्तम फळ म्हणजे भगवंताची भेट होणे. भेट होणे ह्याचा अर्थ भकत व भगवंताचे ऐक्य होणे ह्याअर्थाने आपण येथे घ्यायला हवा. भ्गवंत अमर्याद आहे , अजन्मा आहे व मृत्यातीत अर्थातच आहे. तो सत्‌ चित्‌ आनंदमय आहे. जेंव्हा भक्ताचे भगवंताशी ऐक्य घडते तेंव्हा तो पण जन्म मृत्यातीत सच्चिदानंदस्वरूपच होते.

येथे एक शंका येईल की असे खरेच होत असेल कां? पण जर आपण कोणत्याही संत पुरूषाचे चरीत्र पाहीले तर असे आढळते की संत असेच होते. त्यामुळे ते जरी शरीरत्याग करून गेले तरी त्यांच्या भक्तांना त्यांच्या अस्तित्वाचे अनुभव येत असतात. योगी अरविंदांना विवेकानंदांनी अरबिंदो तुरुंगात असताना मार्गदर्शन केले असे एक उदाहरण मला येथे आठवते. निर्याणानंतर कल्याण स्वामींना समर्थांनी दर्शन दिले व त्यांच्या मनाचे समाधान केले ही कथा पण जगप्रसिद्ध आहे.

जोवर भक्त व भगवंत वेगळे असताता तोवर अशा भक्तावर मायेचा प्रभाव ह्या वेगळे असण्यामुळेच होत असतो. ह्या मायेच्या प्रभावामुळे अशा भक्ताच्या मनामधे दु:, करूणा, अशा ह्या भावांचा पण आविष्कार होतो.

पण जेंव्हा आत्मज्ञान होते व भक्त भगवंताचे ऐक्य घडते व मोक्षप्राप्ती होते.

हेच खरेतर प्रत्येक जीवात्म्याचे मूल ध्येय असते. पण जन्म होताक्षणीच मायेच्या प्रभावाखाली येऊन तो ते विसरतो. पुढे पूर्वसुकृतानुसार मुमुक्षुत्व निर्माण होते व भक्त आपल्या ध्येयप्रप्प्तीसाठी प्रयत्न करू लागतो. शेवटी जेंव्हा ध्येय प्राप्ती होते भक्त भगवंताचे ऐक्य होऊन भक्त ब्रह्मरूप होतो
.
श्रीमद्‍ भगवद‌गीतेमधे स्थितप्रज्ञाची लक्षणे अर्जूनाने विचारली त्याचीच येथे आपल्याला आठवण होते.

अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-
) अभंगाच्या पहिल्याच चरणात महाराज म्हणतात की " जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन । भगवंत जाण त्याचेजवळी ॥ १॥
ह्या पहिल्याच चरणामधे तुकाराम महाराजांनी वाहत्या गंगेचे उदाहरण दिलेले आहे.
( टीप:- गंगा वाहती आहे हे उदाहरण तुकाराम महाराजांनी कां दिले आहे ? ह्याचा मला कांहीकेल्या उलगडा होत नव्हता. पण अशा वेळी सद्‍गुरूच मार्ग दाखवतात हेच खरे. मी दि. १७ ऑगस्ट्ला सत्संगाला गेलो होतो व सद्‌गुरुंच्याच " मुन्नेरू म्हणजे तामिळमधे पुढे चला -चालत रहा " ह्या पुस्तकातल्या पहिल्याच ह्याच नावाच्या प्रवचनावर सत्संग प्रवचन होते व त्यात वरील चरणाचा अर्थ स्पष्ट झाला तोच आता लिहित आहे.)

आपल्याकडे सर्व नद्यां पवित्रच मानतात. त्यांच्यामधे गंगानदीला सर्वोत्तम स्थान आहे. गंगेमधे जो कांही ओहोळ , ओढा , लहान मोठी नदी, नाला कोणतेही पाणी असो ; एकदा कां ते गंगेला मिळाले की ते गंगाच होते. गंगा आपल्यामधे सर्व सामावून घेत व तरीही पवित्रच राहते. तॊ समुद्राकडे वाहत असते व शेवटी समुद्राला जाऊन मिळते. येथे समुद्र म्हणजे भगवंत असा अर्थ घेतला तर योग्य ठरते.

स्वामी विवेकानंदांच्या शिकागोच्या पहिल्याच भाषणामुळे प्रसिद्ध झालेले एक वाक्य आहे .ते म्हणजे " आकाशात्‌ पतितं तोयं , यथा गच्छति सागरात्‌ ; सर्व देव नमस्कारान केशवं प्रति गच्छति " अर्थात जसे आकाशातून पडलेले पाणी शेवटी समुद्रालाच जाऊन मिळते , तसेच सर्व देवांना केलेले नमस्कार शेवटी एका केशवालाच पोहोचतो. पाणी सर्वप्रथम ओहोळ स्वरूपातच असते. ते गंगेस मिळाले की शुद्ध होते तद्वतच प्रत्येक भक्ताचे मन त्याच्या भगवदभक्तीप्रेमामुळे मनाने हळुहळु शुद्ध होत असतो.
पाणी जर वाहते नसेल तर ते अशुद्ध होते , म्हणून पाणी वाहतेच हवे. अर्थात जरी मन जरी शुद्ध झाले आहे असे वाटले तरी साधना भक्तीभावाने ही चालूच ठेवायला /रहायला हवी. वाहणारी गंगाच शेवटी समुद्राला मिळू शकते तसेच सतत न कंटाळताता केलेली साधनाच शेवटी भक्त व भगवंताचे ऐक्य घडवून आणते.
प्रत्येकाच्या मनशुद्धीच्या पातळिनुसार हे ऐक्य कदाचित एकाच जन्मात साध्य होईल अथवा श्रीमद-भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ६ व्या अध्यायाप्रमाणे पुढच्या जन्मात होईल. जशी गंगा वाहते तसेच भक्ताने आपली साधनाभक्तीभावाने-प्रेमाने करत रहावी. हे येथे स्पष्ट झाले.

अर्थात भकत अजूनही मायेच्या आवरणाखालीच वावरत असल्यामुळे त्याच्या साधनेमधे अनेक अडथळे येत रहातात. त्यातले कांही जे मला सुचले ते पाहूया.

) आपल्या जवळच्या आप्त, मित्राबद्दल काळजी वाटणे.
) पैसा पुरे पडेल कां? हा विचार सतावणे.
) मोठ्या आजारपणांची, म्हातारपणाची काळजी वाटणे.
) जे विषय आवडीचे आहेत पण ज्यांच्या मागे लागल्याने फक्त वेळेचा नास होतो हेव कळले तरी त्यांच्या मागे मनाचे धावणे. ( उदाहरणार्थ जुनी गाणी आवडली म्हणून ती यू ट्यूब पाहण्यात , सिनेमे पाहण्यात वेळ घालवणे.
) लोकांनी आपल्या सांगण्यालाच मान देऊन आपलेच म्हणणे ऐकावे असे वाटणे. व जर कोणी आपल्या सांगाण्याविषयी कांही खुलासा करत असेल तर ते आपल्याला विरोध करत आहेत , मान देत नाहीत असे वाटणे.
) झोपेच्या बाबतीत जागरूक असणे पण भगवंताचे नामस्मरण पूजाकरणे , आपले प्रत्येक कार्य ही भगवंताची पूजा करतो आहे ही भावना ठेवण्या विषयी साठी मात्र तसे जागरूक नसणे.
) संत पुरुषांचे वांङ्मय सोडून ईतर पुस्तके करमणूकीसाठी वाचणे व वेळ वाय घालवणे. .
) वेळेचे नियोजन न करणे व अमूल्यवेळ वाया घालवणॆ.
) स्वत:च्या रागावर नियंत्रण न ठेवणे व कडू बोलणे.
१०) घेतलेली वस्तू वेळीच तिच्या ठरविलेल्या जागी न ठेवणे.
११) अन्नाच्या बाबतीत फार चोखंदळ असणे.
१२) नीटनेटके न राहाणे. व्यायाम न करता फक्त औषधांवर अवलंबून असणे.

हे सर्व अडथळे पार करणे हे जरी कठीण असले तरी जर मृत्यूचे स्मरण असले, तर मात्र ते सहज पार करता येतात. हीच खरी तपस्चर्या होय. अर्थात ह्याच बरोबर आपल्या सद्‌गुरूंना/ भगवंतास संपूर्ण पणे शरण जाणे पण ह्याच बरोबर हवेच. शरणागत भक्ताचे वागणे जागॄत अवस्थेत वर लिहिलेल्या प्रमाणे प्रयत्न करण्याचे असते. व जेंव्हा तो झोपी जातो तेंव्हा भगवंतास सांगूतो की आता मी झोपी जात आहे. आता तूच मला सांभाळ.
असे जो वागत असतो त्याच्याजवळ भगवंत नेहमी उभेच आहेत अस्दे तुकाराम महाराजांनी पहिल्याच चरणामधे सांगितले आहे.

) म्हणूनच अभंगाच्या दुसऱ्या चरणामधे महाराज म्हणतात की "देव त्याच्यापाशी त्याच्या भक्तीभावामुळे उभाच आहे व अशा भक्ताला स्वानंदाचा गाभा असा भगवंतच प्रत्यक्ष दिसतो॥२ ॥" असा शरणागत भक्त भगवंतास अत्यंत प्रिय असतो.
भगवंतानी गीतेमधे असे वचन दिले आहे की अशा भक्तांचा योगक्षेम मीच वाहातो.

हे तुकाराम महाराजांचे स्वानुभवाचे बोल आहेत. त्यांना विठ्ठलाचे दर्शन झालेले होते व ते स्वर्गात त्याच्याकडे गेल्यानंतर पाठविलेल्या अभंगात हा भाग येत आहे.
मी कर्ता नाही तर माझ्या जीवनात जे कांही घडते ते भगवंतच करत आहे. हा भाव अत्यंत महत्वाचा आहे. भगवंत हा सच्चिदानंद रूपच आहे. भक्ताला आपले दैवत आपल्याजवळ आहे हा अनुभवच अत्यंत आनंददायी आहे/ असतो. भगवंत जरी अव्यकत असला तरी तो आपल्याजवळ आहे असे अनुभव अनेकांना आलेले माझ्या ऐकण्यात / वाचनात आहेत. असा भकत नेहमीच , कोणत्याही परिस्थितीत समाधानी असतो.

) अभंगाच्या ३ ऱ्या व ४ थ्या ऱ्या चरणात महाराज म्हणतात " त्याला भगवंताचे अंगुष्ठमात्र असणारे रूप दिसते, ज्याला हा अनुभव आहे त्यालाच ही खूण समजेल ॥३॥ ही खूण ज्यांना आत्मस्वरूपाचा अनुभव मिळाला आहे तेच समजतात. तुका म्हणतो की ही पदवी म्हणजे स्थिती ज्याची ( पात्रता आहे) त्यालाच लाभते. ॥४॥

ह्या चरणांचा अर्थ सरळ सोपा आहे . “ अशा भक्ताला भगवंताचे अंगठ्याएवढे रूप दिसते.” येथे महाराज शरीरांतर्गत अंतरात्म्याचे उपनिषदांमधे केलेल्या वर्णनाचा संदर्भ देत आहेत. येथे आपल्या सारख्या सामान्यांना असे रूप दिसत नाही पण मी जे सांगतॊ आहे ते ज्याला असे दर्शन झाले त्यालाच हे समजेल असेही त्यांनी सांगितले आहे. अर्थात असे दर्शन आपल्याला व्हावे ही आकांक्षा मनामधे निर्माण व्हावी हा सुद्धा कदाचित येथे उद्देश असू शकतो.
असे दर्शन होंणे म्हणजेच आत्मज्ञान होणे होय. ते होण्याची पात्रता अंगी असावी लागते. हे पण तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगू हा अभंग पूर्ण केला आहे.

अभंगाची शिकवण :- शिकवण हीच आहे की ज्याला मोक्ष हवा आहे त्याने अभंगाच्या पहिल्या चरणावर विवरण केल्या प्रमाणे आचरण करून अशी पात्रता स्वत:मधे आणावी. ह्याला किती वेळ लागेल हे सांगता येत नसले तरी अशी पात्रता अंगी येण्याचे प्रयत्न आपण नक्की करू शकतो.






0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home