Friday, July 4, 2014

67A th Marathi post तुजलागीं माझा जीव जाला पिसा
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
Contact mail address is rgphadke@gmail.com

तुजलागीं माझा जीव जाला पिसा । अवलोकिंतो दिशा पांडुरंगा ॥ १ ॥
सांडिला व्यवहार माया लोकाचार । छंद निरंतर हाचि मनीं ॥ २॥
आइकिलें कांनी तें रुप लोचन । देखावया सीण करिताती ॥ ३॥
प्राण हाविकळ होय कासाविस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥ ४॥
तुका म्हणें आता कोण तो उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥ ५॥

शब्दार्थ :-

हे देवा पांडुरंगा , माझा जीव तुझ्याकरता वेडा झाल्याने मी दाहीदिशांस तुला शोधतो आहे ॥ १॥
आता माझ्या मनांत फक्त तुझे दर्शन व्हावे हाच एकच छंद उरला आहे, लोकव्यवहाराचा मी त्याग केला आहे ॥ २॥ 
तुझ्या स्वरूपाचे जे वर्णन मी ऐकलें आहे तेच रूप दिसावे ह्याच्यासाठी माझे डोळे लागले आहेत व ( तू न दिसल्यामुळे ते थकले आहेत). ॥ ३॥
पाण्यावाचून मासा जसा तळमळतो तसेच माझा प्राण तुझ्या दर्शनाकरतां तळमळत आहे ॥ ४ ॥ 
तुका म्हणतो की ज्या योगे तुझे दर्शन होईल असा कोणता उपाय मी आता करू? ॥ ५॥



अभंगामागची भूमिका :-
भगवंताची भेट कशी होईल असे प्रत्येक भक्ताला वाटते. ह्याचे कारण म्हणजे मनामधे भगवंत आहेच व तोच मला सर्व दु:खातून सोडवेल ही मनाची खात्री म्हणजे भाव भक्ताच्या मनामधे असतो. भाव याचा संस्कृतमधला अर्थ हाच आहे की " असण्याची खात्री असणे ". गीतमधे म्हटल्याप्रमाणे फक्त भगवंतच खरा आहे व बाकी सर्व एक भासच आहे ( गीत अ.२ श्लोक १६ ) .असा भाव भक्ताच्या मनामधे असतोच व शिवाय त्याच्या मनामधे भगवंताबद्दल पराकोटीचे प्रेम पण असते.

असा भक्त भगवंताच्या भेटीसाठी व्याकूळ होतो .ही स्थिति येणे म्हणजे भगवंताच्या साक्षात्काराची वेळ जवळ येणे होय. तुकाराम महाराजांची अशी स्थिति असताना त्यांनी हा अभंग रचला आहे. महाराजांचे चरीत्र पाहिले की ते अशा स्थितीत होते असे आढळते.

अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-

तुकाराम महाराज पांडुरंगाला आर्तभावाने विचारताहेत की हे देवा, तुझ्यासाठी माझा जीव अगदी वेडापिसा झाला आहे. तू कोठेतरी दिसशील म्हणुन नजर सर्व दिशांना भिरभिरत पाहाते आहे. तुझी भेट व्हावी म्हणून मी सर्व कांही लोकव्यवहार सोडून दिले आहेत. आता मनाला एकच छंद लागला आहे तो म्हणजे तुझे दर्शन व्हावे. तू कसा आहेस हे मला माहीत नाही. पण मी तुझ्या रूपाचे वर्णन ऐकले आहे.
( आपण सर्व जाणतोच की असे भगवंताच्या रूपाचे वर्णन निरनिराळ्या स्तोत्रांत, भगवद्‍गीतेमधे, भगवतामधे आले आहे.)
पण ते रुप कांही मला दिसत नाही आहे व आता माझे डोळे तुझ वाट पाहून थकले आहेत. जर माश्याला पाण्याबाहेर काढले तर तो जसा तळमळतो तशीच तळमळ मला तुझ्या दर्शनाची लागली आहे. महाराज शेवटी देवांना विनवितात की "हे देवा तूच ह्यावर उपाय सांग जेणेकरून मला तुझे दर्शन होईल.”

अभंगाची शिकवण :-

ह्या अभंगाचा उद्देश आत्मपरीक्षणा करताच आपल्याला करता येतो. आपण स्वत:चे अंत:करण तपासुन समजू शकतो की आपल्याला खरेच अशी भगवंताच्या भेटीची तळमळ लागली आहे कां?
परमार्थामधे असे आत्मपरीक्षण करणे महत्वाचे आहे.




0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home