Tuesday, August 5, 2014

68 A Marahti मराठी postअभंग १+२ सद्‌गुरू रायें कृपा मज केली , माझिये मनींचा जाणोनिया भाव 
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.in
 Contact mail address is rgphadke@gmail.com

अभंग १ ला :-
सद्‌गुरू रायें कृपा मज केली । परि नाही घडली सेवा कांही ॥ १ १॥
सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥ २।\
भोजना मागती तूप पावशेर । पडला विसर स्वप्नामाजीं ॥ ३॥
काय कळें उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा जाली ॥ ४॥
राघव चैतन्य केशव चैतन्य । सांगितली खूण माळिकेची ॥ ५ ॥
बाबाजी आपुलें सांगितलें नाम । मंत्र दिला रामकृष्णहरि ॥ ६ ॥
माघ शुद्ध दशमी पाहूनि गुरुवार । केला अंगिकार तुका म्हणें ॥ ७॥

अभंग २ रा :-
माझिये मनींचा जाणोनिया भाव । तो करी उपाय गुरूराजा ॥ १॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नव्हे गुंफा कांही कोठें ॥ २॥
जाती पुढे एक उतरले पार । हाभवसागर साधुसंत ॥ ३॥
जाणत्या नेणत्या ज्या जैंसी आवडी । उतार सांगडी तापे पेटी ॥ ४॥
तुका म्हणे मज दावियेला तारू । कॄपेचा सागरु पांडुरंग ॥ ५॥

अभंगामागची भूमिका :-
भक्तीमार्ग असो व ज्ञानमार्ग असो कोणत्याही मार्गाने केलेल्या परमार्थ साधनेमधे साधक अनेक टप्पे पार केल्यानंतरच त्याच्या ध्येयाकडे म्हणजे मोक्षापर्यंत पोहोचतो. तो जसाजसा प्रगती करतो तसेतसे त्याला कांही अतिंद्रिय अनुभव येत असतात. व हे सर्व एखाद्यामार्गावर असणार्या मार्गदर्शक पाट्यांप्रमाणे असते. खरा साधक हे ओळखतो व त्याच्या साधनेला ह्यामुळे अधिकाधिक जोर येतो.
साधनेमुळे मुख्यत: साधकामधील "मी" म्हणजेच अहंभावाचे जवळजवळ संपूर्ण निर्मूलन जेंव्हा होते व मनाची शुद्धी होते. पण तरीही साधना अपूरीच एकातह्रेने असते. कारण मनामधे अत्यंत थोडा कां होईना अहंभाव " मी साधना करतो आहे ही जाणीव " उरलेली असते. ती सुद्धा जेंव्हा संपूर्ण संपते तेव्हाच त्याला स्वस्वरूपाचे ज्ञान होते मोक्ष मिळतो. देवदर्शन होते.
हे घडण्यासाठी सद्‍गुरुकृपाच आवश्यक असते. म्हणुन अध्यात्मामधे सद्‍गुरुंचे महत्व अनन्यसाधारण आहे.
सद्‍गुरु आपल्या शिष्याला अनुग्रह देऊन ( सद्‍गुरू आपल्या शिष्याला उपदेश करतात व त्याला मोक्षाची वाट दाखवतात.) साधनेच्या ह्या शेवटच्या टप्प्यावर नेतात.
अशी सद्‌गुरूभेट म्हणुनच साधकासाठी अत्यंत महत्वाची घटना असते. अशी भेट झाली की होणारा आनंद प्रत्येक संतानी शब्दबद्ध केलेला आढळतो.
उदाहरणार्थ संत मीराबाईचे पद " म्हाने चाकर राखोजी ", परमहंस योगानंदांचे पुस्तक “ एका योग्याची आत्मकथा “ मधे हे असे वर्णन आढळते..

नुकतीच गुरुपोर्णिमा होऊन गेली. गुरुपोर्णिमा आषाढ महिन्याच्या शुक्लपक्षात येते. गुरुपोर्णिमेला आपल्याकडे गुरुपूजन करतात. येथे मुख्यत: सद्‍गुरूंचे पूजन करणे महत्वाचे मानले जाते. सद्‍गुरू आपल्यामधील "अहंभावाचे " निर्मूलन करून आपल्याला भवसागर पार नेतात. म्हणुनच -त्यांच्या ह्या कृपेबद्दल गुरुपोर्णिमेला त्याचे पूजन करून आपंण आपली कृतज्ञता व्यक्त करत असतो.

तुकाराम महाराजाचे वरील दोन अभंग असा झालेला आनंद व कृतज्ञता व्यक्त करणारे आहेत.
तुकाराम महाराजांनी त्यांच्यावर गुरुकृपा कशी झाली ते पहिल्या अभंगात सांगितले आहे व दुसरा अभंग त्याचेच सविस्तर वर्णन करणारा आहे.

अभंगाचा भावार्थ :-
अभंग १ ला :-
तुकाराम महाराज आपल्याला सद्‍गुरुंनी अनुग्रह कसा दिला ते सांगताना म्हणतात की " माघ महिन्यातल्या शुद्ध दशमी ह्या तिथीला, गुरुवारी माझ्या सद्‍गुरुंनी माझ्यावर कृपा केली व स्वप्नामधे येऊन मला अनुग्रह दिला. स्वप्नामधे मी गंगास्नानासाठी जात होतो तेंव्हा ते मला भेटले , माझ्या मस्तकावर आपला हात ठेवून मला त्यांनी आपले नांव बाबाजी असे सांगितले. तसेच आपली गुरुपरंपरा
राघवचैतन्य केशवचैतन्य अशी आहे हे पण सांगितले. मला त्यांनी "रामकृष्णहरि" हा मंत्रोपदेश त्यांनी केला. व माझा अंगीकार केला. ”

महाराज अभंगामधे आनंदानेच म्हणतात की माझ्या मनी पांडुरंगाची भेट व्हावी अशीच ईच्छा होती. माझ्या अंतरंगातील भाव पाहून माझ्या सद्‍गुरुंना मला उपदेश करण्याची घाई झाली होती असेच मला वाटते. तसेच मला ह्याची खंत वाटते की सद्‍गुरुरायांनी माझ्याकडुन फक्त पावशेर तूप मागितले पण मला त्यांची ही मागणी पूर्ण करता आली नाही.
तुपाची मागणी पुर्ण न होणे व तेथेच तुकाराम महाराजांचे स्वप्न भंग झाले ह्याचा अर्थ माझ्या मते हा होतो की सद्‍गुरूना तुकाराम महाराजांनी जागृत अवस्थेमधे असताना आपले वागणे सात्विक ठेवावे असा असावा.

स्वप्नावस्थेत कालाची परिमाणे व जागृतीतली काळाची परिमाणे वेगळी असतात. स्वप्नामधला मोठा काळ जागृतीतला फारतर तासाभराचा असतो हा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे. तुकाराम महारज ब्रह्मावस्थेत असल्याने त्यांचा दृष्टीने स्वप्न व जागृतीमधे फरक नाही. ते स्वत:तर कालातीत होते. पण संतांचे अनुकरण बाकीचॆ करतात. त्यासाठीच आम्ही ह्या जगामधे आलेलो आहोत असे एका अभंगात स्वत: तुकाराम महाराजांनी सांगितलेच आहे.

आपण जर महाराजांचे चरित्र पाहीले तर असे आढळते की महाराज हे शांतीचा सात्विकतेची सगुण मूर्तीच होते. त्यांचा सर्व योगक्षेम भगवंताने वाहिला व त्यांना कॊणत्याही परिस्थितीत कसलाही कमीपणा येऊ दिला नाही. . त्यांचे अभंग भगवंताने भिजू दिले नाहीत. शिवाजी महाराज त्यांचे कीर्त्नन ऐकत असताना मोगलांना सगळेजण शिवाजीमहाराजांसारखे दिसल्याने कांहीच करता आले नाही. तसे घडले नसते तर काय इतिहास झाला असता याची कल्पनाच करवत नाही. असो.


अभंग २ रा :-

आधिच्या अभंगात म्हटल्याप्रमाणे सद्‍गुरुंना तुकाराम महाराजांच्या मनातला भाव कळला होता हे ह्या अभंगात स्पष्ट होते. तसेच तुकाराम महाराज हा अनुग्रह होण्यापूर्वी ज्या मंत्राचा जप करीत असत तोच मंत्र सद्‍गुरुंनी त्यांना अनुग्रह देताना सांगितला असे महाराज येथे म्हणताहेत. ह्यामुळे त्यांच्या मनामधे कसलाही गोंधळ उरलेला नाही असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. खरेच आहे ! सद्‍गुरू आपल्या शिष्य़ाला कधीच संशयात टाकत नाही उलट संशयाचे निवारणच करतात. हे सद्‍गुरुंचे वैशिष्ठ्य येथे स्पष्ट झाले आहे. सद्‍गुरू हे खरेतर कल्पवृक्षा सारखेच असतात. ज्याला जसे आवडते व ज्याच्यामुळे भलेच होईल तेच सद्‍गुरु आपल्या शिष्याला देतात. त्यांचा मुख्य भर शिष्याने ह्या भवसागरातून तरून जावे ह्यावरच असतो.

सद्‍गुरु तसेच परब्रह्म पांडुरंग हे वेगळे नाहीत. हे पण येथे स्पष्ट झाले. तुकाराम महाराज परब्रह्मासच पांडुरंग म्हणतात, मीराबाई श्रीकृष्ण तर समर्थ रामदास श्रीराम असे संबोधतात. अभंगात म्हटल्याप्रमाणे नामस्मरण करूनच अनेकांचा उद्धार झाला हे पुन:एकदा तुकाराम महाराजांनी ह्या अभंगात सांगितले आहे.

अभंगाची शिकवण :-
माणसाने भगवंतावर अनन्यभावे श्रद्धा ठेवून त्याचे अखंड नामस्मरण करावे ,निदान तसे प्रयत्न करावे . योग्य वेळी सद्‍गुरूकृपा होईलच ह्याची ग्वाही ह्या दोन अभंगाद्वारे आपल्याला येथे मिळाली आहे. अर्थात आता यापुढे तसे आचरण करणे हे आपल्याच हाती आहे..



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home